गुंडगिरी रोखण्यास पोलीस सक्षम; सामाजिक विषयांवर नागरिकांनो पुढे या !
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 13:29 IST2022-06-03T13:22:23+5:302022-06-03T13:29:24+5:30
दामिनी पथकाची पुनर्रचना; महाविद्यालयांत गस्त वाढविण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत

गुंडगिरी रोखण्यास पोलीस सक्षम; सामाजिक विषयांवर नागरिकांनो पुढे या !
औरंगाबाद : शहरात गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. गुंडांना रोखण्यासाठी पोलीस सक्षम आहेत. मागील महिन्यात झालेल्या विविध खुनांच्या घटनेतील आरोपी व मृत हे एकमेकांच्या ओळखीचे होते. प्रेमप्रकरण, कौटुंबिक कलह आणि मित्रांमधील दुराव्यामुळे त्या घटना घडल्या. आरोपींना पोलिसांनी तत्काळ अटक केली. ही गुंडगिरीची समस्या नसून, सामाजिक समस्या आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी शहरातील नागरिक, स्वयंसेवी संस्था, पालकांनी पुढे आले पाहिजे, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी केले.
पोलीस आयुक्त डॉ. गुप्ता म्हणाले, शाळा-महाविद्यालयांत आपली मुले काय करतात, याकडे पालकांचे लक्ष असले पाहिजे. आपल्या मुलामुलींचे मित्र कोण, ते कोणाशी बोलतात, मुलगा नशा तर करीत नाही ना, याकडे लक्ष ठेवले पाहिजे. निरीक्षक गीता बागवडे यांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या. तेव्हा अनेक मुले-मुली क्लास सोडून एकत्र बसलेले आढळून आले. मुलांच्या पालकांनी आपले पाल्य क्लासेसलाच जातात की कोठे, याकडेही लक्ष ठेवण्याची गरज आहे. पोलीस शक्य होईल, तेवढे काम करीत आहेत. मात्र, या प्रकारांना अधिक व्यापक प्रमाणात आळा घालण्यासाठी पालक, शिक्षक, मित्र, शेजाऱ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. शहर पोलीस अनेक स्वयंसेवी संस्थांशी संपर्क साधत आहेत. नशेखोरीवर जनजागृती करीत आहेत. पण, हे प्रयत्न अपुरे आहेत. त्यासाठी नागरिकांनी पुढे येऊन पोलिसांना मदत केली पाहिजे.
आता दामिनीची दोन पथके
महाविद्यालयांसह निर्जनस्थळी गस्त वाढविण्यासाठी दामिनीच दोन पथके राहतील. एक पथक कार्यरत असून दुसरे पथक स्थापन करण्यात येत आहे. प्रत्येक महाविद्यालयात एक तक्रारपेटी ठेवली जाईल. ही पेटी दामिनी पथकाच्या उपस्थितीत उघडली जाईल. त्याशिवाय गांजा, चरस, अफूसह इतर अमली पदार्थांवर नियंत्रण मिळविण्यासाठीही एक पथक स्थापन केले आहे. ठाण्याच्या हद्दीत असलेल्या महाविद्यालयांमध्ये संबंधित पोलीस गस्त घालतील.
४३ दिवस उपचार केले
नशेच्या आहारी गेलेल्या एका युवकावर पोलिसांनी शहरातील दवाखान्यात तब्बल ४३ दिवस उपचार केले. तो आता नशामुक्त झाला आहे. पुढील आठवड्यात पोलीस शहरातील नागरिकांची बैठक घेणार आहेत. त्यामध्ये त्या मुलाला बाेलावण्याचा विचार सुरू आहे. पोलीस सामाजिक स्वास्थ्य टिकविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. मात्र, त्याला नागरिकांची साथ मिळणे गरजेचे असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.