- राहुल मुळेवाळूज महानगर : वाळूज औद्योगिक परिसरातील परदेशवाडी तलावाचे पाणी अत्यंत प्रदूषित असल्याचे शासकीय तपासणीत उघड झाल्यानंतर, या दूषित पाण्यामुळे टेंभापुरी तलावाच्या सुरक्षिततेवरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. परदेशवाडी प्रकल्पातील पाण्यात घातक रसायनांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळले आहे. हे पाणी पिण्यास योग्य नाहीच, पण सिंचनासाठीही अयोग्य ठरवण्यात आले आहे. हे दूषित पाणी झऱ्यांद्वारे, भूगर्भातून, तसेच पाटातून वाहत टेंभापुरी तलावात जाते.
टेंभापुरी तलाव हा परिसरातील हजारो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा एक महत्त्वाचा स्रोत आहे. या तलावावर अनेक शेतकरी सिंचनासाठीही अवलंबून आहेत. परदेशवाडी प्रकल्पात आणि परिसरात करण्यात आलेल्या तपासणीत पाण्यामध्ये त्वचा विकार, हृदयविकार, किडनी विकार, कॅन्सर, थायरॉईड, डोळ्यांचे आजार, ब्ल्यू बेबी सिंड्रोम आणि फ्लोरोसिस यांसारख्या गंभीर आजारांना कारणीभूत ठरणारे घटक आढळले आहेत.
"आमचा जगण्याचा हक्क हिरावला जातो आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे अत्यावश्यक आहे," असे जोगेश्वरी, रामराई, वाळूज, टेंभापुरी, रांजणगाव, आदी परिसरातील ग्रामस्थांनी स्पष्ट केले.
प्रशासनाकडून दुर्लक्षप्रदूषण नियंत्रण मंडळ, आरोग्य विभाग, एमआयडीसी आणि कृषी विभाग यांच्याकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. याच धोरणाचा फटका आता टेंभापुरी तलावालाही बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तातडीच्या उपाययोजना१. टेंभापुरी तलावाचे पाणी तत्काळ तपासण्यात यावे. तलावाच्या आजूबाजूच्या झऱ्यांची व भूगर्भ जलवाहिन्यांची दिशा व गुणवत्ता पाहून प्रदूषणाची कारणे रोखावीत.२. परदेशवाडी प्रकल्पात जलशुद्धीकरण यंत्रणा त्वरित उभारावी. एमआयडीसी परिसरातील रासायनिक सांडपाणी पूर्णपणे नियंत्रित करावे.
त्वरित उपाययोजना करा, अन्यथा..."परदेशवाडी व टेंभापुरी मध्यम प्रकल्प दूषित पाण्याच्या संदर्भात योग्य ती दखल घेऊन दोषी असणाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा शेतकरी कृती समितीच्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन मोठे आंदोलन उभारू."-धनंजय ढोले, सरपंच, टेंभापुरी
पाणीपुरवठ्यावर ताण"टेंभापुरी मध्यम प्रकल्पावर २१ गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. या प्रश्नावर पारदर्शक आणि काटेकोर कारवाई करण्याची मागणी समितीकडून व्यक्त केली जात आहे."-राहुल पाटील ढोले, शेतकरी कृती समिती, गंगापूर
स्वागतार्ह तपासणी, पण..."टेंभापुरी जलप्रकल्प व परदेशवाडी तलावातील पाण्याची स्थिती गंभीर आहे. जिल्हा आरोग्य विभागाने पाण्याचे नमुने घेतले हे स्वागतार्ह आहे, मात्र केवळ तपासणी पुरेशी नाही. दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे."- विठ्ठल पाटील कुंजर, शेतकरी, शिवराई
प्रदूषण मंडळाचे पत्रपाणी प्रदूषणावर म.प्र.नि. मंडळ कार्यालयाकडून या ठिकाणचे पाण्याचे नमुने संकलित केले असून, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांच्याकडून अहवाल मागविण्यात आलेला आहे," असे पत्र प्रदूषण मंडळाकडून देण्यात आले आहे.