दुसऱ्या शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवयित्री आशा डांगे यांची निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 16:28 IST2025-01-22T16:27:22+5:302025-01-22T16:28:25+5:30

शिक्षकांच्या साहित्यप्रतिभेला आणि कलेला अधिकचा वाव मिळावा, लिहित्या हातांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने हे शिक्षक साहित्य संमेलन आयोजित करण्यात येते. 

Poet Asha Dange elected as the president of the second Shikshak Sahitya Sanmelan | दुसऱ्या शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवयित्री आशा डांगे यांची निवड

दुसऱ्या शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवयित्री आशा डांगे यांची निवड

छत्रपती संभाजीनगर: जिल्हा परिषदेची शिक्षण विभागातर्फे आयोजित दुसऱ्या शिक्षकसाहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवयित्री, लेखिका आशा डांगे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. कवयित्री डांगे या शहरातील बळीराम पाटील विद्यालयात मागील २७ वर्षापासून सहशिक्षिका म्हणून कार्यरत असून शिक्षणशास्त्र विषयात पी.एचडी. करत आहेत. या निवडीबाबत जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अश्विनी लाटकर-पानसरे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

शाळांमध्ये अनेक गुणी साहित्यिक, कवी, कलावंत शिक्षक आहेत. भाषा व कला विकासात आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व तसेच सर्वांगीण विकासात हे शिक्षक मोलाचे योगदान देत असतात. या शिक्षकांच्या साहित्यप्रतिभेला आणि कलेला अधिकचा वाव मिळावा, लिहित्या हातांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने हे शिक्षक साहित्य संमेलन आयोजित करण्यात येते. 

जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अश्विनी लाटकर, शिक्षणाधिकारी (योजना) अरुणा भूमकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, आंग्लभाषेच्या संचालक डॉ. राठोड, डायटच्या प्राचार्या देशमुख, डायटचे ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. विशाल तायडे आणि पहिल्या शिक्षक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. हबीब भंडारे या सात सदस्यीय निवड समितीने यंदाच्या दुसऱ्या शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची निवड केलेली आहे. 

आशा डांगे यांची निवड झाल्याबद्दल वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य राजाराम राठोड, उपाध्यक्ष ऍड. अभय राठोड, सचिव नितीन राठोड, कोषाध्यक्ष डॉ. बिपिन राठोड, कार्यकारिणी सदस्य माधुरी राठोड, रितू राठोड यांनी अभिनंदन केले आहे. त्याप्रमाणे  शिक्षकवर्ग आणि साहित्यिक वर्तुळातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

शिक्षिका आशा डांगे सुप्रसिद्ध कवयित्री, लेखिका
कवयित्री आशा डांगे या बळीराम पाटील विद्यालय छत्रपती संभाजीनगर येथे गेल्या २७ वर्षापासून सहशिक्षिका म्हणून कार्यरत असून शिक्षणशास्त्र विषयात पी.एचडी. करत आहेत. बालभारती, पुणे यांच्या कार्यानुभव व मराठी विषयाच्या पुस्तकांच्या समीक्षण समितीत त्या कार्यरत होत्या. अनेक शिक्षक प्रशिक्षणात तज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांनी कार्य केलेले आहे. त्यांचे 'परिघाबाहेर' आणि  'प्रिय, हा कण गॉड पार्टिकल आहे...' हे दोन कवितासंग्रह प्रकाशित आहेत. त्यांच्या साहित्यिक कार्याबद्दल अनेक मान्यवर साहित्यसंस्थांचे पुरस्कार आजपर्यंत त्यांना मिळालेले आहेत. त्यांच्या कवितासंग्रहांचे हिंदी, गुजराती अशा विविध भाषांमध्ये अनुवाददेखील झालेले आहेत. पहिल्या शिक्षक साहित्य संमेलनामध्ये तयार करण्यात आलेल्या 'काव्यदिंडी' या कवितासंग्रहाच्या संपदानामध्ये त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. 'कथा नवलेखकांच्या' हा संपादन ग्रंथही त्यांच्या नावावर आहे. विविध परिसंवाद, कवी संमेलने, साहित्य संमेलने यात त्यांचा सहभाग असतो. महाराष्ट्रातील अनेक अग्रगण्य दैनिकातून आणि नियतकालिकातून त्यांचे लेख, कविता, कथा प्रकाशित झाल्या आहेत.

Web Title: Poet Asha Dange elected as the president of the second Shikshak Sahitya Sanmelan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.