सुखद ! १६९६ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 19:28 IST2021-07-24T19:27:50+5:302021-07-24T19:28:26+5:30
ग्रामीण भागातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना तीन टक्के वेतनवाढ ही १ जुलैपासून लागू करण्यात आली आहे.

सुखद ! १६९६ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार
औरंगाबाद : ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, कार्यालयीन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मूळ वेतनाच्या ३ टक्के वार्षिक वेतनवाढ करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी दिले. यानुसार, पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार आहे.
ग्रामीण भागातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना तीन टक्के वेतनवाढ ही १ जुलैपासून लागू करण्यात आली आहे. येत्या ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या पगारात वेतनवाढीचा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातर्फे देण्यात आलेल्या प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविली आहे. या वेतनवाढीचा लाभ सहा उपविभागीय पोलीस अधिकारी, १९ पोलीस निरीक्षक, ३५ सहायक पोलीस निरीक्षक, ७७ पोलीस उपनिरीक्षक असे एकूण १३७ पोलीस अधिकारी आणि सहायक फौजदार १४७, पोलीस हेडकॉन्स्टेबल ३८५, पोलीस नाईक ४३८, पोलीस कॉन्स्टेबल ६८२ असे एकूण १६५२ जणांना होणार आहे. याशिवाय ४४ कार्यालयीन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचाही वेतनवाढीत समावेश आहे.