अरुण घोडे, औरंगाबादप्रोझोन प्रासादात व्हायोलिन अकादमीच्या भगीरथ प्रयत्नांनी येथील उद्यम व्यापार क्षेत्रातील रसिकाश्रय दात्यांच्या मदतीने पाचव्या वर्षात पदार्पण केलेल्या स्वरझंकार उत्सवाची सुरुवात मेवाती घराण्याचे ख्यातनाम गायक संजीव अभ्यंकरांच्या चंद्रकौंस रागातल्या ‘पिया बिन परत नाही इक पलहु चैन’ने झाली. बागेश्री अंगाच्या चंद्रकौंसच्या स्वरांनी समस्त रसिक प्रासाद भारून गेला. काळजाचा ठाव घेणाऱ्या मोहक आवाजाची देन लाभलेल्या संजीव अभ्यंकरांनी ‘ले जारे जा कगरवा, पिया को संदेसवा, तरपत हूं मैं जागी सारी रतियां अजहूँ ना आये मोरे पिया’ या चीजेतील भाव रसिकांपर्यंत गाण्यातून अशा सुबोध शैलीत सादर केला की, जणू आईने लेकराला घास घास भरवावे. चंद्रकौंस रागातील बडा ख्याल व द्रुत गायिल्यानंतर त्यांनी रसिकांशी संवाद साधला. शास्त्रीय संगीत रीतसर न शिकलेल्या लोकांनाही अभिजात संगीताची आवड निर्माण होईल एवढा समर्पक हृद्य संवाद त्यांनी साधला. पूर्वार्धानंतर वेणूवादन कार्यक्रमाची नांदी देणारी चीज ‘बन्सी रे बजाओ वही राग, वही तान, वही सूर, वही गान सुनाओ, नट नागर नाचत ताथैया’ या कलावती रागातील भावावस्थेपर्यंत आधीच जाण्याचा योग रसिकांना आला. दोन अभंगांनी त्यांनी गायनाचा समारोप केला. संजीव अभ्यंकरांना संवादिनीवर साथ तन्मय देवचके, तर तालाची रंगत रोहित मुजुमदार यांनी सांभाळली. दुसऱ्या दिवसाच्या स्वरझंकारचा उत्तरार्ध वेणूबासरीचे जणू पर्यायवाची नामाभिधान लाभलेल्या पद्मविभूषण हरिप्रसाद चौरसिया यांच्या वेणूवादनाने सुरू झाला. सुगंधी धूपदीप जळताना अगरबत्तीचा धूर मंद मंद हळुवार वळणे घेत वातावरणात विरघळून एकरूप होतो. तो सुगंधी धूर कलात्मक वळणे घेत आपल्या चित्तवृत्तींना अल्हादित करतो. तसे शब्द, अर्थाचा कसलाच झमेला नसलेले हे वेणूवादन म्हणजे विशुद्ध स्वरानंद. वेणूच्या या जादुई स्वरांना आपल्या तालावर खेळविताना पद्मश्री विजय घाटे यांच्या तबल्याने रंगतदार साथ दिली. आधी राग बिहाग नंतर जैजैवंती आणि दक्षिण भारतीय राग हंसध्वनी सादर केल्यानंतर पंडितजी आणि संगतकार विजय घाटे यांची तालस्वर जुगलबंदी रसिकांची दाद मिळवून गेली. वेणूवादनाला तानपुरीची संगत सुष्मिता डव्हाळकर, तर बांसरीची संगत सोनार यांनी केली. पंडितजींचा सत्कार अनिल इरावने, रणजीतदास, एन.पी. शर्मा यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजीव शेलार यांंनी केले.
बन्सी के बजैया बन्सी रे बजाओ
By admin | Updated: November 30, 2014 00:59 IST