करमाडच्या ‘मेडिकल हब’ मधून राज्यभर औषधी पाठविण्याचे नियोजन कागदावरच
By संतोष हिरेमठ | Updated: May 24, 2025 13:35 IST2025-05-24T13:28:22+5:302025-05-24T13:35:01+5:30
राज्यस्तरीय औषधी भांडार : ३० कोटींच्या निधीतून उभारणी; चार वर्षांनंतर बांधकाम पूर्ण

करमाडच्या ‘मेडिकल हब’ मधून राज्यभर औषधी पाठविण्याचे नियोजन कागदावरच
छत्रपती संभाजीनगर : करमाड (ता. जि. छत्रपती संभाजीनगर) येथे ‘मेडिकल हब’ म्हणजे राज्यस्तरीय औषधी भांडार उभारण्यात आले आहे. कारण, हे ठिकाण राज्याचे मध्यवर्ती असून, येथून राज्यभरात सरकारी रुग्णालयास औषधी पाठविणे सोपे होईल, असे यंत्रणेकडून सांगण्यात आले. इमारत बांधून तयार आहे; पण येथून अद्याप औषध भांडार कार्यान्वित झालेले नाही. सद्या खरेदीप्रक्रियेनंतर पुरवठादारांकडून थेट सरकारी रुग्णालयांपर्यंत औषधी, वैद्यकीय साहित्यांचा पुरवठा केला जातो. त्यामुळे या मेडिकल हबचा वापर कसा करायचा? असा प्रश्न आरोग्य यंत्रणेला पडला आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत करमाड येथे औषधी भांडारसह प्रशिक्षण केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. शुक्रवारी सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव-१ डॉ. निपुण विनायक आणि सचिव-२ वीरेंद्र सिंह यांनी औषधी भांडारला भेट दिली. त्यामुळे गेले काही दिवस युद्धपातळीवर विद्युतीकरणासह रेंगाळलेली कामे पूर्ण करण्यासाठी आरोग्य विभागाने चांगलाच जोर लावला.
पूर्वी ई-निविदा, मग ‘हाफकिन’, आता प्राधिकरण
आरोग्य विभागाने २०११ पासून ई-निविदा पद्धतीने औषधी साहित्य, सामग्रीच्या मध्यवर्ती खरेदी प्रणालीचा अवलंब सुरू केला. त्याचाच एक भाग म्हणून राज्याच्या मध्यवर्ती भागात राज्यस्तरीय औषधी भांडार स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी विविध शहरांचे, गावांचे सर्वेक्षण करण्यात आले. अखेर छत्रपती संभाजीनगरातील करमाड येथे औषधी भांडार उभारण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर ‘हाफकिन’कडून औषधी खरेदी सुरू करण्यात आल्यानंतर हे राज्यस्तरीय औषध भांडार गुंडाळण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु, या औषधी भांडारची नियोजनाप्रमाणे उभारणी करण्यात आली. ‘हाफकिन’ऐवजी आता स्वतंत्र ‘महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण’च्या माध्यमातून औषधी खरेदी होत आहे. खरेदी प्रक्रियेनंतर थेट रुग्णालयांना औषधी पाठविली जातात. त्यामुळे या मेडिकल हबचा वापर कसा होईल, हा प्रश्न अनुत्तरित आहे.
३० कोटींच्या निधीतून उभारणी
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत औषधी भांडार आणि प्रशिक्षण केंद्राच्या बांधकामासाठी २०१९ मध्ये ३० कोटी ११ लाख ९२ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला. त्यानंतर दोन वर्षांनी छत्रपती संभाजीनगरातील करमाड येथे औषधी भांडार उभारण्यास सुरुवात झाली. या औषधी भांडारच्या बांधकामाला २०२१ मध्ये सुरुवात झाली. तब्बल चार वर्षांनंतर आता कुठे काम पूर्ण झाले.
वरिष्ठ पातळीवरून नियोजन, निर्णय
करमाड येथील औषधी भांडारचे काम पूर्ण झालेले आहे. औषधी भांडारच्या वापरासंदर्भात वरिष्ठ पातळीवरून नियोजन आणि निर्णय होईल.
-डाॅ. कांचन वानेरे, आरोग्य उपसंचालक