पिंपळवंडीचे अश्वलिंग मंदिर हेमाडपंथी बांधकामाचा उत्तम नमुना
By Admin | Updated: August 19, 2014 02:11 IST2014-08-18T00:13:50+5:302014-08-19T02:11:36+5:30
विलास भोसले , पाटोदा तालुक्यातील पिंपळवंडी येथील अश्वलिंग देवस्थानवरील हेमाडपंथी मंदिर पुरातन आहे़ चौथ्या श्रावणी सोमवारी येथे मोठी यात्रा भरते़ अध्यात्माबरोबरच शिक्षणावर

पिंपळवंडीचे अश्वलिंग मंदिर हेमाडपंथी बांधकामाचा उत्तम नमुना
विलास भोसले , पाटोदा
तालुक्यातील पिंपळवंडी येथील अश्वलिंग देवस्थानवरील हेमाडपंथी मंदिर पुरातन आहे़ चौथ्या श्रावणी सोमवारी येथे मोठी यात्रा भरते़ अध्यात्माबरोबरच शिक्षणावर भर देणारे हे संस्थान तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारे ठरले आहे़
आद्य शंकराचार्य चंद्रशेखर भारती यांनी पिंपळवंडी येथील अश्वलिंग देवस्थानाची स्थापना केली़ ज्योतिर्लिंग देवस्थानानंतर स्कंद पुराणामध्ये वर्णन असलेल्या १०० शिवमंदिरामध्ये या देवस्थानाचा उल्लेख आहे़ पिंपळाच्या झाडाखालचा महादेव म्हणून या शिवालयाला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे़ देवस्थानचे प्रमुख गंगाभारती महाराज यांनी संजीवन अर्थात जिवंतपणे समाधी घेतली, अशी अख्यायिका आहे़ हेमाडपंथी पध्दतीचे कोरीव बांधकाम अतिशय लक्षवेधी आहे़ गाभाऱ्यात महादेवाची आकर्षक पिंड असून कार्तिकस्वामींचे देखील मंदिर आहे़ याशिवाय गणपती, पार्वती आणि शंकर यांची एकत्रित मूर्ती आहे़ कार्तिक स्वामींचे मंदिर केवळ कार्तिक पौर्णिमेलाच भाविकांसाठी खुले होते़
चौथ्या श्रावणी सोमवारी येथे मोठी यात्रा भरते़ अतिशय निसर्गरम्य वातावरण असलेल्या या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे़ अमृत भारती यांच्या नावाने विद्यालय सुरु असून पाचवी ते बारावीचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत़
यात्रेत नर्तिका नाचविण्याची येथे अनेक वर्षांची परंपरा होती़ १२ वर्षापूर्वी गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन ही प्रथा बंद केली़ त्यामुळे यात्रा उत्साहात व शांततेत पार पडते, असे मधुकर शास्त्री यांनी सांगितले़ देवस्थानवर कोट्यावधींची विकास कामे सुरु असल्याचे ते म्हणाले़