बनावट कागदपत्रांवर Phd प्रवेशामुळे तुमची फसवणूक, तुम्हीच कारवाई करा: वाराणसी विद्यापीठ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 18:10 IST2025-08-14T18:10:21+5:302025-08-14T18:10:21+5:30
बनावट कागदपत्रांच्या आधारे पीएच.डी. प्रवेश प्रकरणात विद्यापीठांची एकमेकांकडे टोलवाटोलवी

बनावट कागदपत्रांवर Phd प्रवेशामुळे तुमची फसवणूक, तुम्हीच कारवाई करा: वाराणसी विद्यापीठ
छत्रपती संभाजीनगर : वाराणसी येथील महात्मा गांधी काशी विद्यापीठाच्या बनावट कागदपत्रांच्या आधारे एका विद्यार्थ्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ‘पेट’ परीक्षेच्या माध्यमातून पीएच.डी.ला प्रवेश मिळवला. त्यासाठी सादर केलेली कागदपत्रे बनावट असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर विद्यापीठाने संबंधित प्रवेश रद्द केला. त्याचवेळी वाराणसीच्या विद्यापीठाला संबंधितांवर कारवाईसाठी पत्र पाठविले. मात्र, वाराणसीच्या विद्यापीठाने पत्राला उत्तर देत तुमची फसवणूक झालेली असल्यामुळे तुम्हीच कारवाई करा, असे पत्रानेच कळविले. त्यामुळे दोन्ही विद्यापीठ कारवाईसाठी चालढकल करीत एकमेकांकडे टोलवत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
विद्यापीठाने पीएच.डी. प्रवेशासाठी २०२१ मध्ये ‘पेट’ परीक्षा घेतली होती. सिद्दीकी मोहम्मद शोएब हबीबुद्दीन हा विद्यार्थी प्राणीशास्त्र विषयातून पेट परीक्षा उत्तीर्ण झाला. पेट परीक्षेसाठी सादर केलेले बीएस्सी आणि एम. एस्सी.चे मार्कमेमो आणि पदव्या उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील महात्मा गांधी काशी विद्यापीठाच्या होत्या. हे प्रमाणपत्र बनावट असल्याचे रिपाइं (आठवले) पक्षाचे शहराध्यक्ष नागराज गायकवाड यांनी उघडकीस आणले. त्याविषयी विद्यापीठाला निवेदन दिल्यानंतर प्रशासनाने वाराणसी विद्यापीठाला पत्रव्यवहार करून खात्री करून घेतली. त्यानंतर ८ जुलै रोजी विद्यापीठाने संबंधित विद्यार्थ्याची पीएच.डी. नोंदणी रद्द केली. मात्र, अशाच प्रकारच्या दोन प्रकरणांमध्ये विद्यापीठाने बेगमपुरा पोलिस ठाण्यात संंबंधितांच्या विरोधात गुन्हा नोंदवला होता.
या प्रकरणात गुन्हा नोंदविला नसल्यामुळे तक्रारदार नागराज गायकवाड यांनी प्रशासनाला वारंवार निवेदने दिली. त्याशिवाय आंदोलनेही केली. त्यावर विद्यापीठ प्रशासनाने वाराणसीच्या विद्यापीठाला पत्र पाठवून आपल्या विद्यापीठाचे बनावट कागदपत्रे तयार केली असल्यामुळे आपण कारवाई करावी, असे म्हटले होते. त्या पत्राला नुकतेच वाराणसीच्या विद्यापीठाने उत्तर दिले असून, त्यात तुमच्या विद्यापीठात बनावट कागदपत्रे देऊन प्रवेश दिला असल्यामुळे आपणच कारवाई करावी, असे स्पष्ट केले. त्यामुळे या पत्रावर विद्यापीठ प्रशासन कोणता निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.