एकट्या मुलीला पाहून विकृत कारचालकाचे अश्लील इशारे; संतप्त युवतीने पोलिसांसमोरच बदडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 15:39 IST2025-11-05T15:35:46+5:302025-11-05T15:39:21+5:30
नोटा दाखवून अश्लील इशारे करणे पडले महागात; अल्पवयीन तरुणीने विकृताचा माज उतरवला

एकट्या मुलीला पाहून विकृत कारचालकाचे अश्लील इशारे; संतप्त युवतीने पोलिसांसमोरच बदडले
छत्रपती संभाजीनगर : सोमवारी क्रांती चौकात मैत्रिणीची वाट पाहत थांबलेल्या १७ वर्षीय मुलीला पाहून एका विकृत कार चालकाने अश्लील इशारे केले. मुलीने त्याकडे दुर्लक्ष करत तेथून काढता पाय घेतला. मात्र, त्यानंतरही त्याने तिचा पाठलाग सुरू केला. मुलीने जवळच उभ्या वाहतूक पोलिसांना सांगितल्यावर दामिनी पथकही आले. मग त्यांच्यासमोर विकृत गयावया करायला लागला. संतप्त तरुणीने मात्र तेथेच त्याची धुलाई करत माज उतरवला. याप्रकरणी खिवाराम कानाराम देवासी (४८, रा. हुबळी, कर्नाटक) याच्यावर क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
जालना जिल्ह्यातील १७ वर्षीय मुलगी शेतकरी कुटुंबातील आहे. ती शिक्षणासाठी शहरात असते. ती दुपारी ३ वाजता क्रांती चौकात मैत्रिणीची वाट पाहत होती. यावेळी खिवाराम तेथेच होता. तरुणीला पाहून त्याने अश्लील चाळे सुरू केले. सुरुवातीला युवतीने त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, खिवारामने चाळे सुरूच ठेवले. नोटा दाखवून इशारे केले. त्यामुळे तरुणीने जवळच उभ्या वाहतूक पोलिसांकडे धाव घेतली. तर त्याने तिचा पाठलाग सुरू केला. वाहतूक पोलिसांकडून ही बाब कळताच पोलिस निरीक्षक सुनील माने, दामिनी पथकाच्या अंमलदार निर्मला निंभोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले, दामिनी पथकप्रमुख कांचन मिरधे यांनी घटनेची गंभीर दखल घेतली.
मुलीने धुतले, मग पाया पडून गयावया
पोलिसांनी त्याला विचारणा करताच खिवारामची बोबडी वळली. संतप्त युवतीने त्याची पोलिसांसमक्ष यथेच्छ धुलाई केली. यावेळी बघ्यांची गर्दी जमा झाली. आपण पुरते अडकलो गेल्याचे कळाल्यानंतर खिवाराम तरुणीच्या पाया पकडून माफी मागत गयावया करू लागला. त्यानंतर त्याला क्रांती चौक पोलिस ठाण्यात नेण्यात आले. तरुणीचे कुटुंब सोबत नसल्याने तरुणीने तक्रार देण्यास नकार दिला. त्यानंतर निरीक्षक सुनील माने यांनी त्याच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करून प्रतिबंधात्मक कारवाई केली.
चालक, प्रवासी सोडण्यासाठी शहरात
घटनेवेळी क्रांती चौकात बघ्यांची गर्दी जमली होती. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त करण्यात आला. विवाहित असलेला खयाराम मूळ कर्नाटक राज्यातील असून, सध्या कामानिमित्त पुण्यात स्थायिक आहे. सोमवारी तो प्रवासी सोडण्यासाठी शहरात आला होता.