औरंगजेबाच्या कबरीनंतर प्रकाश आंबेडकरांची भद्रा मारूती मंदीरास भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2023 20:29 IST2023-06-17T20:23:31+5:302023-06-17T20:29:58+5:30
मी अगोदरपासून मंदीरात जातो लोकांच्या श्रध्देचा मान राखला पाहिजे, ज्यानी मानायचे त्यांनी मानावे कुणी एकमेकांचा अपमान करू नये.

औरंगजेबाच्या कबरीनंतर प्रकाश आंबेडकरांची भद्रा मारूती मंदीरास भेट
खुलताबाद: वचिंत बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज शनिवारी दुपारी खुलताबाद येथील औरंगजेब यांच्या कबरीला भेट दिली त्यानंतर लागलीच साडेसहा वाजता भद्रा मारूती मंदीरात जावून मनोभावे दर्शन घेतले. त्यावेळी पत्रकारांशी बोलतांनी ते म्हणाले की, मी अगोदरपासून मंदीरात जातो लोकांच्या श्रध्देचा मान राखला पाहिजे. ज्यानी मानायचे त्यांनी मानावे कुणी एकमेकांचा अपमान करू नये. हिंदू धर्माचे ठेकेदार कोरोना काळात लपून बसल्याचा आरोप ही त्यांनी यावेळी केला.
प्रारंभी प्रकाश आंबेडकर यांनी सप्त्नीक भद्रा मारूती मंदीरात जावून दर्शन घेतले त्यानंतर पत्रकारांशी बोलतांनी म्हणाले की, वचिंतचे राज्यस्तरीय शिबीर खुलताबाद येथे दोन दिवसांपासून सुरू असून राज्यातील अनेक कार्यकर्ते या ठिकाण आले आहेत. खुलताबाद येथील मंदीराचे सुरू असलेले कामकाज बघण्यासाठी आलो आहे.
कोरोना काळात वचिंतने राज्यभरात मंदीर उघडण्यासाठी आंदोलने केले आहे. लोकांच्या श्रध्देचा अपमान सरकारने करू नये. औरंगजेबच्या दरबारामध्ये आपले अनेकजण कामाला होते. राज्यात बारा ठिकाणी दंगली करण्याचा प्रयत्न केला. काही जण दंगली करणार याची माहिती सरकारी यंत्रणेला होती. जनतेच्या जागृती मुळे या दंगली यशस्वी झाल्या नाहीत.