कुलगुरू कारभारी काळे यांनी विकसित केलेल्या कृषी प्रणालीला पेटंट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 12:08 IST2025-10-09T12:07:48+5:302025-10-09T12:08:45+5:30
कारभारी काळे यांच्या संशोधनाला १० वे पेटंट जाहीर

कुलगुरू कारभारी काळे यांनी विकसित केलेल्या कृषी प्रणालीला पेटंट
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी विकसित केलेल्या कृषी भूस्थानिक माहिती प्रणालीच्या संशोधनाला केंद्र शासनाच्या पेटंट कार्यालयाचे पेटंट जाहीर झाले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती संदर्भातील माहिती गोळा करणे व निर्णय प्रक्रियेसाठी त्याचा उपयोग करणे यासंदर्भातील हे संशोधन आहे.
पेटंट जाहीर झालेल्या संशोधनात प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. त्यात रिमोट सेन्सिंग प्रतिमा जसे हायपरस्पेक्टल, मल्टीस्पेक्टर आणि पेनक्रोमेटिक प्रतिमा यांचे एकत्रीकरण करते. तसेच, क्षेत्रीय कार्यामधून आणि अधिकृत स्त्राेत्र यांच्याकडून संकलित केलेल्या सेकंडरी डेटासह शेतकऱ्यांकडून गोळा केलेल्या माहितीचाही उपयोग यात सामाविष्ट आहे. पिकांचे प्रकार ओळखणे, तसेच त्यांच्यावरती पडलेल्या रोगांची माहिती मिळवणे, माती संदर्भातील माहिती, दुष्काळासंदर्भातील माहिती तयार करणे याविषयी हे संशोधन आहे. जिओ प्रॅक्टिकल टेक्नॉलॉजीचा प्रभावी वापर करून कृषी भूस्थानिक माहिती प्रणालीसाठी एग्रीकल्चर जिओपॅटिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम एका पद्धतीशी संबंधित आहे. ही प्रणाली शासकीय योजना राबवण्यासाठी आवश्यक असलेली निर्णय सहायक माहिती (डिसिजन सपोर्ट इन्फॉर्मेशन) उपलब्ध करून देते, तसेच सर्व अंतिम वापरकर्त्यांसाठी उपयुक्त ठरते.
सर्व प्रकारची माहिती गोळा होणार
भूस्थानिक तंत्रज्ञान आणि इन्फॉर्मेटिक्स हे उदयोन्मुख क्षेत्र आहे. विशेषतः पृथ्वी निरीक्षणासाठी निर्माण झालेली वैज्ञानिक आणि व्यापारी उपग्रहांची जाळी तसेच प्रगत भूगोल माहिती प्रणालींनी (जीआयएस) पूरक बनलेले तंत्रज्ञान यात समाविष्ट आहे. ही तंत्रज्ञान वापरणारी क्षेत्रे आणि विभाग वेगाने विकसित होत आहेत. तसेच सध्याचा शोध हा विविध सेंसर डेटाच्या एकत्रीकरणासह योग्य प्रक्रिया टप्प्यांद्वारे पिके, माती व दुष्काळ परिस्थिती विषयक माहिती निर्माण करणाऱ्या प्रणाली व पद्धतीशी संबंधित आहे. प्रणालीबद्ध माहिती प्रवाह आणि एकत्रीकरणामुळे ही प्रणाली कमी मनुष्यबळात व अचूकतेसह ज्ञान संग्रह निर्माण करण्यात कार्यक्षम ठरते. या संशोधनासाठी कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांच्यासह डॉ. राजेश धुमाळ, डॉ. अमोल विभुते, डॉ. अजय नागणे, डॉ. संदीप गायकवाड, डॉ. रूपाली सुसारे, डॉ. धनंजय नलवडे आणि डॉ. महेश सोलकर यांनी योगदान दिले.