छत्रपती संभाजीनगरात इंडिगोच्या विमानाने प्रवासी आले; पण बॅगा दिल्लीतच राहिल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 13:41 IST2025-04-17T13:36:01+5:302025-04-17T13:41:04+5:30
सलग दोन दिवस प्रकार, ‘कालच्या आज, आजच्या बॅगा उद्या’

छत्रपती संभाजीनगरात इंडिगोच्या विमानाने प्रवासी आले; पण बॅगा दिल्लीतच राहिल्या
छत्रपती संभाजीनगर : इंडिगोच्या दिल्ली- छत्रपती संभाजीनगरविमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सलग दोन दिवस वेगळ्याच मनस्तापाला सामोरे जावे लागले. विमानाने प्रवासी शहरात दाखल झाले; परंतु त्यांच्या बॅगा दिल्लीतच राहिल्या. याविषयी प्रवाशांनी बुधवारी सायंकाळी विमानतळावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
इंडिगोची शहरातून दिल्लीसाठी नियमित प्रवासी सेवा चालू आहे. मंगळवारी दिल्लीहून आलेल्या काही प्रवाशांचे सामान त्यांच्या बरोबर आलेच नाही. सलग दुसऱ्या दिवशी बुधवारीदेखील असाच प्रकार घडला. दिल्लीहून आलेले प्रवासी विमानतळावर बॅगेसाठी वाट पाहत उभे होते. मात्र, बराच वेळ जाऊनही बॅगा न आल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला. अनेक वाट पाहूनही बॅग न आल्याने प्रवाशांनी यासंदर्भात इंडिगो आणि विमानतळावरील अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. प्रवाशांकडून बॅगांसंदर्भात सविस्तर माहिती घेण्यात आली. यासंदर्भात इंडिगोच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला; परंतु प्रतिसाद मिळाला नाही. विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकाराला दुजोरा दिला.
१५ ते २० प्रवाशांना मनस्ताप
दिल्लीहून बुधवारी आलेल्या जवळपास १५ ते २० प्रवाशांच्या बॅगा आलेल्या नव्हता. या प्रवाशांच्या बॅगा गुरुवारी सकाळी एअर इंडियाच्या विमानाने शहरात दाखल होतील, अशी माहिती विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
मंगळवारच्या बॅगा दाखल
मंगळवारी ज्या प्रवाशांच्या बॅगा दिल्लीत राहिल्या होत्या, त्यांच्या बॅगा या बुधवारच्या विमानाने दाखल झाल्याचेही विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ज्या प्रवाशांना स्वत: बॅगा घेऊ जाता येईल, त्यांना विमानतळावर बॅगा दिल्या जातात आणि ज्यांना शक्य होत नाही, त्यांच्या बॅगा घरपोच दिल्या जातात, अशी माहिती सूत्रांनी दिली.