प्रवाशांचा प्रवास आरामदायक; छत्रपती संभाजीनगरहून पुण्याला जाण्यासाठी दिवसभरात १० ‘शिवाई’
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 13:21 IST2024-12-12T13:21:03+5:302024-12-12T13:21:41+5:30
वायफाय, प्रत्येक आसनाजवळ मोबाइल चार्जिंग, वातानुकूलित यंत्रणा

प्रवाशांचा प्रवास आरामदायक; छत्रपती संभाजीनगरहून पुण्याला जाण्यासाठी दिवसभरात १० ‘शिवाई’
छत्रपती संभाजीनगर : वायफाय, आरामदायक आसनव्यवस्था, प्रत्येक आसनाजवळ मोबाइल चार्जिंग, वातानुकूलित यंत्रणा इ. सुविधा असलेल्या ‘शिवाई’ ही ई-बस पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांच्या पसंतीस पडत आहेत. दिवसभरात एसटी महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगर विभागाच्या ५ आणि पुणे विभागाच्या ५ अशा एकूण १० बसेस पुणे मार्गावर धावत आहेत.
जिल्ह्यात मे २०२३ मध्ये ५ शिवाई बस दाखल झाल्या. त्यानंतर सप्टेंबरपासून जिल्ह्यात अन्य ई-बसेस दाखल झाल्या. शिवाई बससाठी विभाग नियंत्रक कार्यालय परिसरात चार्जिंग स्टेशन साकारण्यात आले. तर ई-बसेससाठी सिडको बसस्थानकात चार्जिंग स्टेशन आहे.
जिल्ह्यात ३८ ई-बसेस
एसटी महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगर विभागात ५ शिवाई बसेससह १२ मीटर आणि ९ मीटरच्या ३८ ई-बसेस आहेत. या ३८ ई-बसेस वेगवेगळ्या मार्गावर धावत आहेत. या ई-बस ग्रामीण भागासाठीही धावत आहेत.
कोणत्या मार्गावर किती ई-बस?
जालना मार्गावर ८ ई-बस
कन्नड मार्गावर ४ ई-बस
सिल्लोड मार्गावर ४ ई-बस
पैठण मार्गावर ६ ई-बस
राजूर मार्गावर ४ ई-बस
मेहकर मार्गावर ५ ई-बस
चिखली मार्गावर ५ ई-बस
दोन महिन्यांत १.५८ कोटींचे उत्पन्न
३८ ई-बसेसच्या माध्यमातून गेल्या दोन महिन्यांत एसटी महामंडळाला १ कोटी ५८ लाख ८५ हजार ८३७ रुपयांचे उत्पन्न मिळाले. आगामी काही दिवसांत हे उत्पन्न आणखी वाढण्याची शक्यता आहे.
प्रवाशांचा प्रतिसाद
विभागातून वेगवेगळ्या मार्गांवर ई-बसेस धावत आहेत. ई-बससेवेला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे. आगामी काळात या ई-बससेवेला प्रवाशांचा आणखी प्रतिसाद वाढले.
- सचिन क्षीरसागर, विभाग नियंत्रक