अचानक अबोल झालेल्या मुलीला पालकांनी विश्वासात घेतले, ब्लॅकमेलकरून रेप झाल्याचे उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 13:12 IST2025-01-25T13:12:08+5:302025-01-25T13:12:18+5:30
फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर वारंवार अत्याचार; एमआयडीसी वाळूज ठाण्यात गुन्हा दाखल

अचानक अबोल झालेल्या मुलीला पालकांनी विश्वासात घेतले, ब्लॅकमेलकरून रेप झाल्याचे उघड
वाळूज महानगर : औद्योगिक परिसरात राहणाऱ्या तरुणीसोबत ओळख वाढवून सोबत काढलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत, तरुणाने १९ वर्षीय युवतीवर बजाजनगर येथील एका लॉजवर नेऊन वारंवार अत्याचार केला. याप्रकरणी युवतीने एमआयडीसी वाळूज पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार रवी राजू मोरे (रा. आंबेलोहळ, ता. गंगापूर) याच्या विरोधात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
औद्योगिक परिसरात कुटुंबीयांसोबत राहणाऱ्या १९ वर्षीय युवतीसोबत आरोपी रवी मोरे याने ओळख वाढवून तिचा मोबाइल क्रमांक मिळवला. मोबाइल क्रमांक मिळाल्यानंतर दोघेजण तासनतास फोनवर गप्पा मारत होते. दरम्यान, आरोपी हा एकांतात भेटण्यासाठी तिच्याकडे सातत्याने आग्रह करत होता. सप्टेंबर २०२४ मध्ये तिने भेटण्यास होकार दिला. दोघेजण शहरातील एका कॉलेज परिसरात भेटले. बराच वेळ गप्पा मारल्यानंतर आरोपीने त्याच्या मोबाइलमध्ये तिच्यासोबत फोटो काढले.
धमकावून भेटण्यासाठी बोलावले
पहिल्या भेटीनंतर काही दिवसांनी आरोपीने त्या युवतीकडे पुन्हा भेटण्याचा आग्रह धरला. मुलगी भेटण्यास तयार होत नसल्याने आरोपीने तिला धमकावत ‘तू मला हॉटेलवर भेट, नाही तर मी काढलेले फोटो तुझ्या आईवडिलांना दाखवितो,’ असे धमकावले. घाबरलेल्या मुलीने घरी कॉलेजला जाते असे सांगून बाहेर पडली. आरोपी त्याच्या दुचाकीवरून मुलीला बजाजनगर, महाराणा प्रताप चौकातील एका हॉटेलवर घेऊन गेला. तिथे त्याने तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. एवढेच नाही, तर स्वत:च्या मोबाइलमध्ये चित्रीकरण करून घेतले. त्यानंतर त्याने तिला शहरातील तिच्या कॉलेज परिसरात सोडले.
पालकांनी विश्वासात घेतल्याने प्रकार उघडकीस
आरोपी रवी मुलीला वारंवार त्याच्या मोबाइलमधील आक्षेपार्ह फोटो घरच्यांना दाखवण्याची धमकी देत, मुलीला शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास भाग पाडत असल्याने मुलीच्या मनावर परिणाम झाला होता. मुलगी अचानक शांत राहत असल्याने पालकांनी तिला विश्वासात घेऊन चौकशी केली असता, मुलीने दिलेल्या माहितीनंतर पालकांना धक्का बसला. पालकांनी मुलीसह एमआयडीसी वाळूज पोलिस ठाणे गाठून आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला.