शालेय पोषण आहारातील तांदळात लेंड्या, अळ्या निघाल्याने पालकांचा राडा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 12:57 PM2024-01-13T12:57:09+5:302024-01-13T13:12:50+5:30

सिल्लोड तालुक्यातील वांगी बुद्रुक जि. प. शाळेतील प्रकार

Parents' shout due to emergence of maggots in school nutrition rice | शालेय पोषण आहारातील तांदळात लेंड्या, अळ्या निघाल्याने पालकांचा राडा

शालेय पोषण आहारातील तांदळात लेंड्या, अळ्या निघाल्याने पालकांचा राडा

सिल्लोड : तालुक्यातील वांगी बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेतील पोषण आहाराच्या तांदळाची शुक्रवारी सकाळी ११ वाजता ग्रामस्थांनी पाहणी केली. त्यात अळ्या व उंदराच्या लेंड्या आढळल्यामुळे पालकांनी चांगलाच राडा केला.

वांगी बुद्रुक येथे पहिली ते सातवीपर्यंत जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा असून त्यात १३३ विद्यार्थी शिक्षण घेतात. शुक्रवारी राजमाता जिजाऊ यांची जयंती असल्याने या कार्यक्रमासाठी सरपंच बापूराव काकडे व पालक शाळेत उपस्थित होते. जयंती साजरी करताना पोषण आहार घेऊन ठेकेदारांची गाडी आली. व त्यांनी पोषण आहाराचा दहा कट्टे तांदूळ शाळेच्या खोलीत टाकला. यावेळी तेथे असलेल्या सरपंच बापू काकडे, पालक माधवराव तायडे, प्रकाश काकडे, ईश्वर काकडे, गजानन काकडे, लतीफ शहा, गणेश काकडे यांनी तेथे जाऊन त्या तांदळांची तपासणी केली. तेव्हा त्यात चक्क अळ्या व उंदरांच्या लेंड्या दिसल्या. त्यांनी याबाबत शिक्षण विस्तार अधिकारी राजू फुसे यांना दूरध्वनीवरून माहिती दिली. या निकृष्ट आहारामुळे जर विद्यार्थ्यांना विषबाधा झाली तर याला कोण जबाबदार राहील, असे मत यावेळी पालकांनी व्यक्त केले.

आहार बदलून देऊ
सदर पोषण आहार हा ठेकेदार पुरवठा करतो. याच्याशी आमचा संबंध नसतो. शुक्रवारी वांगी बु. येथे पुरवठा झालेल्या तांदळात अळ्या व उंदराच्या लेंड्या निघाल्याची तक्रार आली आहे. याबाबत संबंधित ठेकेदाराला कळवले असून त्याने आहार बदलून देतो, असे सांगितले आहे. तो आहार वापरू नये, अशा सूचना शिक्षकांना दिल्या आहेत.

मुलांच्या जिवाशी खेळ...
हल्ली शाळांना पुरवठा केला जाणारा आहार हा निकृष्ट दर्जाचा येत आहे. काही दिवसांपूर्वी धोत्रा येथील पोषण आहारात तर चक्क मेलेला उंदीर निघाला होता. वांगी बु. येथील आहारात अळ्या व उंदराच्या लेंड्या निघाल्या. हा तर विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार आहे. याची वरिष्ठ पातळीवर चौकशी होऊन दोषींविरुद्ध कठोर कार्यवाही करावी.
- बापूराव काकडे, सरपंच, वांगी बुद्रुक

 

Web Title: Parents' shout due to emergence of maggots in school nutrition rice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.