घरचे लग्न करून देईनात, तो चोरू लागला महिलांची अंतरवस्त्रे; विक्षिप्त तरुणास जमावाने चोपले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2023 20:03 IST2023-07-22T19:58:43+5:302023-07-22T20:03:41+5:30
महिला व तरुणींची अंतरवस्त्रे चोरी करणाऱ्या विक्षिप्त तरुणास नागरिकांनी चोप देत दामिनी पथकाच्या स्वाधीन केले.

घरचे लग्न करून देईनात, तो चोरू लागला महिलांची अंतरवस्त्रे; विक्षिप्त तरुणास जमावाने चोपले
- मेहमूद शेख
वाळूज महानगर : घरची मंडळी लग्न करीत नसल्याने महिला व तरुणींची अंतरवस्त्रे चोरी करण्याची त्याला सवय लागली. या विक्षिप्त तरुणास शनिवारी नागरिकांनी सिडको महानगरात पकडून बेदम चोप देत दामिनी पथकाच्या स्वाधीन केले.
सिडको वाळूजमहानगर परिसरात घराच्या बाल्कनी व आवारात वाळत घातलेली महिलांची अंतरवस्त्रे गायब होत होती. गत दोन महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. परंतु महिला याची वाच्यता करीत नव्हत्या. परंतु कुटुंबा-कटुुंबातूनही दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. सोसायटीतील नागरिकांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली असता एक तरुण घरासमोर वाळत घातलेली महिलांची अंतरवस्त्रे रात्री-अपरात्री चोरी करताना टिपला होता. ही अंतरवस्त्रे घेऊन तो ती परिधान करून अश्लील चाळे करीत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. त्या नंतर नागरिकांनी या अनोळखी तरुणावर पाळत ठेवली होती.
तरुणास धरून जमावाने चोपले
शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास सिडको वाळूजमहानगरातील सारा वृंदावन सोसायटीसमोर बसलेल्या तरुणांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद हा विक्षिप्त तरुण नजरेस पडला. तरुणांनी त्या विक्षिप्त तरुणास पकडून चोप देण्यास सुरुवात केली. हा गोंधळ पाहून सोसायटीतील महिला व अन्य नागरिकांचा मोठा जमाव जमला. या प्रकाराची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथकाच्या पोना. निर्मला निंभोरे, पोकॉ. गिरीजा आंधळे, पोकॉ. सोनाली निकम व ११२च्या पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून त्या विक्षिप्त तरुणास ताब्यात घेतले.
म्हणून लागली सवय
अंतरवस्त्रे चोरणारा सचिन सारंगधर दिंडोरे (१९, रा. सिडको वाळूजमहानगर) याची दामिनी पथकाने कसून चौकशी केली. तो बजाजनगरात एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करतो. घरातील मंडळीना अनेकदा सांगूनही ते माझे लग्न करण्यास टाळाटाळ करीत असल्याने महिलांची अंतरवस्त्रे चोरी करण्याची सवय लागल्याची कबुली त्याने दिली.