मुंडे बहिण-भावांनी एकत्र घेतले वैद्यनाथाचे दर्शन; श्रावण सोमवारी लाखो भाविकांची परळीत गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 17:17 IST2025-08-04T17:04:04+5:302025-08-04T17:17:36+5:30
दर्शनानंतर मुंडे भावंडांनी देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत परळी शहरातील तीर्थक्षेत्र विकास योजना व इतर प्रलंबित कामांचा आढावा घेतला.

मुंडे बहिण-भावांनी एकत्र घेतले वैद्यनाथाचे दर्शन; श्रावण सोमवारी लाखो भाविकांची परळीत गर्दी
परळी (बीड) : श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी परळीतील प्रभू श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली. त्या भक्तिरसात एक उल्लेखनीय क्षण ठरला राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे आणि माजी कृषी मंत्री व आमदार धनंजय मुंडे या बहिण-भावाने एकत्र येत प्रभू श्री वैद्यनाथाचे दर्शन घेतले.
दर्शनानंतर दोघेही वैद्यनाथ मंदिर कार्यालयात गेले. यावेळी त्यांनी देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत परळी शहरातील तीर्थक्षेत्र विकास योजना व इतर प्रलंबित कामांचा आढावा घेतला. या चर्चेत देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व्यंकटेश मुंडे, सचिव प्रा. बाबासाहेब देशमुख व विश्वस्त राजेश देशमुख उपस्थित होते. त्याआधी माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनीही मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
रविवारी रात्रीपासूनच दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली होती. पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत "हर हर महादेव" च्या जयघोषात लाखो भाविकांनी शिवदर्शन घेतले. मंदिर परिसर विद्युत रोषणाई, फुलांची सजावट आणि चोख पोलिस बंदोबस्तामुळे उजळून निघाला होता. महिला भाविकांसाठी शिवमुठ, तीळ अर्पण आणि बेलफूल अर्पण करण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली होती.
दरम्यान, लातूर जिल्ह्यातील निवाडा, कोळगाव, कोरेगाव येथून आलेल्या भाविकांच्या पायी दिंडीने परळीत प्रवेश केला. श्री संत जगमित्र नागा मंदिरात या दिंडीचे स्वागत झाले. तसेच खडका येथून निघालेल्या कावड यात्रेनेही परळीतील मंदिरात हजेरी लावली. गेल्या तीन वर्षांपासून भीमराव डावरे यांच्या मार्गदर्शनाखाली या यात्रेचे आयोजन केले जाते.
श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट व नाथ प्रतिष्ठान यांच्या वतीने आलेल्या भाविकांसाठी खिचडी, राजगिरा लाडू आणि भोजन प्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. एकूणच, श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक ऐक्याने भारलेला ठरला.