अनवाणी पायांसाठी ‘तिने’ जमवली शेकडो पादत्राणे, सुरू केली गोरगरिबांसाठी मोफत ‘शू बँक’

By संतोष हिरेमठ | Published: March 6, 2024 02:45 PM2024-03-06T14:45:23+5:302024-03-06T14:47:43+5:30

सहावीतील विद्यार्थिनीचा ध्यास; खराब पादत्राणांचे ‘रिसायकलिंग’ करून केली गोरगरिबांना वापरण्यायोग्य

Palak More, 13 yr girl collected hundreds of thrown footwear for bare feet, started 'Shoe Bank' | अनवाणी पायांसाठी ‘तिने’ जमवली शेकडो पादत्राणे, सुरू केली गोरगरिबांसाठी मोफत ‘शू बँक’

अनवाणी पायांसाठी ‘तिने’ जमवली शेकडो पादत्राणे, सुरू केली गोरगरिबांसाठी मोफत ‘शू बँक’

छत्रपती संभाजीनगर : ‘तिचे’ वय अवघे ११ वर्षे. इयत्ता सहावीत. सर्वसामान्यपणे इतरांच्या चपला-बुटांना हात लावणे टाळले जाते. मात्र, या मुलीने पादत्राणेही घेऊ न शकणाऱ्यांच्या अनवाणी पायांसाठी अन् पर्यावरण रक्षणासाठी शेकडो पादत्राणे गोळा केली. इतकेच नाही तर शहरात ‘शू बँक’ही सुरू केली.

पलक मोरे असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. पायाच्या रक्षणासाठी बूट, चप्पलचा वापर केला जातो. गेल्या काळात काहींकडून फॅशन म्हणून गरजेपेक्षा अधिक पादत्राणे घेण्याचा कल वाढला आहे. त्यातून अनेक पादत्राणे महिनोनमहिने घरात पडून असतात. दुसरीकडे अनेकांना अनवाणी भटकंती करावी लागते. ही बाब पलकच्या निदर्शनास पडली आणि तिने जुनी पादत्राणे गोळा करण्याचा निर्णय घेतला. सामाजिक माध्यमांसह स्वत: लोकांना भेटून तिने जुनी पादत्राणे देण्याचे आवाहन केले. तिच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला. सदाशिवनगर, रामनगर स्टाॅप परिसरात ‘शू बँक’ सुरू केली आहे. त्याला नागरिकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. पलकच्या या उपक्रमासाठी वडील डाॅ. प्रशांत मोरे पाटील आणि आई डाॅ. पल्लवी मोरे यांनी पाठबळ दिले. मनपा, प्रदूषण नियंत्रण मंडळ, प्रयास युथ फाऊंडेशन, पादत्राणांशी संबंधित उद्योगांनाही पलकने भेट दिली.

‘रिसायकलिंग’ करून नवीन बनल्या स्लीपर
जमा झालेली आणि वापरण्यायोग्य नसलेली आतापर्यंत ६३१ पादत्राणे मुंबईतील एका कंपनीला ‘रिसायकलिंग’साठी पाठविण्यात आली. त्यापासून नवीन स्लीपर तयार करण्यात आल्या. ‘त्या’ जि. प. हायस्कूल भंडारपाडा, वाडा येथील विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आली. तर जुनी आणि चांगल्या अवस्थेतील पादत्राणे शहरातील विविध भागांतील गरजूंना देण्यात आली. पादत्राणांच्या याच विषयाला अनुसरून ‘ सोल टू सूल’ या विषयावर ‘डाॅ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत’ही सहभाग नोंदविला आहे, असे पलकने सांगितले.

Web Title: Palak More, 13 yr girl collected hundreds of thrown footwear for bare feet, started 'Shoe Bank'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.