५४ वर्षांपूर्वी खुलताबादच्या वेशीत घुमला होता 'पाकिजा'चा सूर! जुन्या आठवणींचा खास रिपोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 12:49 IST2026-02-04T12:47:57+5:302026-02-04T12:49:17+5:30
सिनेमातली ती चिमुकली आता ५४ वर्षांची; जुने फोटो सोशल मीडियावर व्हायरल

५४ वर्षांपूर्वी खुलताबादच्या वेशीत घुमला होता 'पाकिजा'चा सूर! जुन्या आठवणींचा खास रिपोर्ट
संतोष हिरेमठ / सुनील घोडके
छत्रपती संभाजीनगर / खुलताबाद : आजपासून बरोबर ५४ वर्षांपूर्वी, ४ फेब्रुवारी १९७२ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘पाकिजा’ या भव्यदिव्य, पोशाखी, ‘क्लासिक’ अशा हिंदी सिनेमामुळे छत्रपती संभाजीनगरजवळील खुलताबाद हे ऐतिहासिक स्थळ रुपेरी पडद्यावर चमकले.
अशोककुमार व मीनाकुमारी यांचा हृदयस्पर्शी अभिनय, ‘आपके पाँव देखे, बहुत हसीन है, इन्हें जमीन पर मत उतारियेगा’ हा ‘डायलॉगकिंग’ राजकुमार यांचा संवाद, दिग्दर्शक कमाल अमरोहींची कलात्मक दृष्टी, उपेक्षित संगीतकार गुलाम महंमद यांचा सर्वांत गाजलेला (पण त्यांच्या मृत्यूनंतर झळकलेला), असा हा चित्रपट अजरामर झाला. खुलताबादची धार्मिक- ऐतिहासिक ओळख सिनेमाशी जोडली गेली! हा चित्रपट भारतीय सिनेमाच्या इतिहासात मैलाचा दगड ठरला. माजी नगराध्यक्ष ॲड. कैसरोद्दीन सांगतात, ‘त्याकाळी मी इयत्ता चौथीत होतो. अशोककुमार, मीनाकुमारी व इतर कलाकार निजामकालीन रेस्ट हाउसला थांबले होते. शहरातील एका लहान मुलीला चित्रपटात घेतले होते.’ काही ज्येष्ठ आजही या आठवणी सांगतात. ५४ वर्षांनंतर सोशल मीडियावर वेशी, फर्श मोहल्ला व दर्ग्याच्या जुन्या- नवीन फोटोंमुळे 'पाकिजा' पुन्हा व्हायरल झाला आणि ऐतिहासिक गावाच्या आठवणींना उजाळा मिळाला.
चित्रपटातील ती कबर आजही...
उरूस मैदानातील मुंडी टेकडीच्या पायथ्याशी मीनाकुमारी यांचा मृत्यू होऊन ज्या कबरमध्ये दफन केल्याचे सिनेमात दाखवले गेले, ती कबर आजही ‘मीनाकुमारीची कबर’ म्हणून ओळखली जाते.
का निवडले खुलताबाद?
चित्रपटातील भावनिक-शोकात्मक दृश्यांसाठी खुलताबादचे ऐतिहासिक स्थापत्य, दगडी कमानी, भव्य प्रवेशद्वार व शांत रहस्यमय वातावरण आदर्श ठरले. यामुळे दृश्यांना गहन परिणाम मिळाला.
सिनेहेरिटेज
खुलताबाद हे अनेक ऐतिहासिक वारसास्थळांचे केंद्र. 'पाकिजा'मुळे आता 'सिनेहेरिटेज' म्हणूनही ओळखले जाते. चित्रपटप्रेमी, इतिहासकार व पर्यटक इथे भेट देतात.
चित्रीकरणाची प्रमुख ठिकाणे
खुलताबाद येथील म्हैसमाळ रोडवर असलेली शेकडो वर्षे जुनी असलेली वेस, तसेच मुंडी टेकडी, दर्गा व कमान परिसरात चित्रीकरण झाले. टांग्यात लहान मुलाला घेऊन जातानाच्या दृश्याचे, तसेच खुलताबाद येथील फर्श मोहल्ल्यातही शूटिंग झाले होते.
ती चिमुकली आज ५४ वर्षांची
सिनेमात खुलताबाद येथील ज्या लहान मुलीला दाखविले, ती त्या वेळेस दीड महिन्याची होती. आता त्या ५४ वर्षांच्या आहेत. त्यांचे नाव हसीना बेगम खैरोद्दीन असून, खुलताबाद न.प.चे निवृत्त कर्मचारी इरफानोद्दीन खैरोद्दीन यांच्या त्या बहीण व न.प.चे निवृत्त कर्मचारी मुखत्यार हफिजोद्दीन यांच्या त्या पत्नी आहेत, अशी माहिती माजी नगराध्यक्ष ॲड. कैसरोद्दीन यांनी दिली.