पाकला झुकवले, भूमाफियांनी हरवले; १७ वर्षानंतर औरंगाबादमध्ये परतलेल्या महिलेचा प्लॉट हडप
By सुमेध उघडे | Updated: February 4, 2021 17:42 IST2021-02-04T17:25:44+5:302021-02-04T17:42:52+5:30
पासपोर्ट हरवल्यामुळे पाकिस्तानच्या जेलमध्ये तब्बल १७ वर्षे राहिलेल्या हसीनाबीबी ऊर्फ सहजाली ऊर्फ हसीना शेख अब्दुल करीम (वय ५०, रा. रशीदपुरा) यांना सिटीचौक पोलिसांच्या अहवालानंतर नुकतेच मायदेशी परतता आले.

पाकला झुकवले, भूमाफियांनी हरवले; १७ वर्षानंतर औरंगाबादमध्ये परतलेल्या महिलेचा प्लॉट हडप
औरंगाबाद : शहरातील एका प्लॉटच्या कागदपत्रांवरून पाकिस्तानच्या जेलमधून तब्बल १७ वर्षानंतर हसीना बेगम भारतात परतल्या. मात्र, शहरात परतल्यानंतर ज्या प्लॉटच्या कागदपत्रांच्या आधारे त्यांची सुटका झाली तोच प्लॉट भूमाफियांनी बळकावला असल्याचे उघडकीस आले आहे. आपला प्लॉट परत मिळावा यासाठी हसीना बेगम पोलीस आयुक्तांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.
पासपोर्ट हरवल्यामुळे पाकिस्तानच्या जेलमध्ये तब्बल १७ वर्षे राहिलेल्या हसीनाबीबी ऊर्फ सहजाली ऊर्फ हसीना शेख अब्दुल करीम (वय ५०, रा. रशीदपुरा) यांना सिटीचौक पोलिसांच्या अहवालानंतर नुकतेच मायदेशी परतता आले. २६ जानेवारी (प्रजासत्ताकदिनी) रोजी त्या रेल्वेने औरंगाबादेतील बहिणीच्या घरी पोहोचल्या. हसीना बेगम यांनी १८ जुलै २००० साली शहरातील रशिद्पुरा येथे एक प्लॉट विकत घेतला होता. याची रजिस्ट्री करण्यात आली होती. यानंतर त्यांचे लग्न झाले आणि त्या उत्तरप्रदेशातील सहारणपूर येथील शेख दिलशाद अहमद यांच्यासोबत झाले. त्यांना मूलबाळ नाही. २००४ साली त्या नातेवाइकांना भेटण्यासाठी रेल्वेने पाकिस्तानला गेल्या होत्या. तेव्हा तेथे त्यांच्या नातेवाइकांची भेट झाली नाही. मात्र, त्यांचा पासपोर्ट हरवला. तेव्हा संशयित म्हणून त्यांना तेथील पोलिसांनी ताब्यात घेतले आणि जेलमध्ये टाकले. तेव्हापासून त्या मायदेशी परत येण्यासाठी प्रयत्न करीत होत्या.
२०१९ साली भारत सरकारला तिची माहिती मिळाली आणि तिला परत आणण्याची कार्यवाही सुरू झाली. ती औरंगाबादची असल्याचे सांगत होती. यामुळे औरंगाबाद पोलिसांना तिच्या नातेवाइकांचा शोध घेण्यास सांगण्यात आले. केवळ चेलीपुरा, औरंगाबाद, असा तिचा पत्ता होता. हा भाग सिटीचौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. यामुळे सिटीचौक पोलिसांना कामाला लावण्यात आले. हवालदार अजीम इनामदार यांनी तिचे नातेवाईक, तसेच तिच्या नावे असलेली स्थानिक संपत्तीची कागदपत्रे मिळविले आणि ती औरंगाबादची असल्याबाबत शिक्कामोर्तब झाले. शिवाय तिच्या बहिणीची मुलगा खाजा जहिरोद्दीन चिश्ती यांचा शोध घेतला. कागदोपत्री कार्यवाही पूर्ण झाल्यावर २१ डिसेंबर रोजी पाकिस्तानमधून अमृतसर (पंजाब) येथे आली. तेव्हापासून ती रेडक्रॉस सोसायटीच्या ताब्यात होती. तिला घेऊन जाण्याचे निर्देश पोलिसांना प्राप्त झाल्यावर पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार महेबूब महेमूद शेख, महिला पोलीस रइसा जमिरोद्दीन शेख यांनी अमृतसर येथे जाऊन हसीनाबीबी यांना २६ जानेवारी रोजी रात्री ९.३० वाजता रेल्वेने औरंगाबादला आणले.
यानंतर हसीना बेगम यांनी आपल्या प्लॉटचा शोध घेतला असता त्या जागी अन्य कोणी राहत असल्याचे दिसून आले. ज्या कागदपत्राच्या आधारे त्या भारतीय नागरिक असल्याचे सिद्ध झाले होते तो प्लॉटचा ताब्यात नसल्याने त्यांना धक्का बसला. या प्रकरणी त्या पोलीस आयुक्तांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. सध्या त्या बहिणीची मुलगा खाजा जहिरोद्दीन चिश्ती याच्या सोबत एका किरायाच्या घरात राहत आहेत.