धोंडे, ठोंबरेंची फोटोसेशनसाठी धडपड मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या व्यथा

By Admin | Updated: September 2, 2015 23:36 IST2015-09-02T23:36:10+5:302015-09-02T23:36:10+5:30

व्यंकटेश वैष्णव , बीड पिण्यासाठी पाणी, जनावरांना चारा अन् हाताला काम नाही. खरीपाची पिके जळून खाक झाली आहेत, अशा व्यथा शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

The pains presented before the Chief Minister for the photo, Dhond, | धोंडे, ठोंबरेंची फोटोसेशनसाठी धडपड मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या व्यथा

धोंडे, ठोंबरेंची फोटोसेशनसाठी धडपड मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या व्यथा


व्यंकटेश वैष्णव , बीड
पिण्यासाठी पाणी, जनावरांना चारा अन् हाताला काम नाही. खरीपाची पिके जळून खाक झाली आहेत, अशा व्यथा शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडल्या. शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी सुरू असलेल्या योजनांचा कित्ता दुष्काळाने होरपळत असलेल्या शेतकऱ्यांसमोर गिरवला. यात ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्र्यावर स्तुतीसुमने उधळण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दुष्काळाची पहाणी करणारे पहिलेच मुख्यमंत्री आहेत, असे विधान करून टाकल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
पाटोदा तालुक्यातील सौताडा येथे बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरीपाच्या पिकांची पहाणी केली. यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी, आ. विनायक मेटे, आ. भीमराव धोंडे, आ. आर. टी. देशमुख, आ. लक्ष्मण पवार, आ. संगिता ठोंबरे, रमेश आडसकर यांची उपस्थिती होती. सौताडा येथे दुपारी ४ वाजून २८ मिनिटाने मुख्यमंत्र्यांचे परंडा येथून पाटोदा तालुक्यातील सौताडा येथे आगमन झाले. येथील विठ्ठल पेचे यांच्या सोयाबीनची पहाणी मुख्यमंत्र्यांनी केली. याशिवाय अशोक पेचे यांच्या मनरेगा अंतर्गत बांधलेल्या विहिरीला भेट दिली.
साहेब आता जगायचे कसे...
सौताडा येथे शेतकऱ्यांच्या पिक नुकसानीची पहाणी मुख्यमंत्र्यांनी केली. यावेळी सिताबाई सुखदेव सानप यांच्यासह काही महिला शेतकऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. यावेळी महिलांनी पिण्याचे पाणी व पिकांच्या नुकसानीमुळे उद्भवलेली परिस्थिती मुख्यमंत्र्यासमोर मांडताना म्हटले की, साहेब, चार वर्षापासून दुष्काळाचे चटके आम्ही सोसतोत. खरीपाची पेरणी कसीबशी केली. मात्र पावसाअभावी आमची पिके जळून खाक झालेली आहेत. आता तर जनावरांना चारा अन् पिण्यासाठी पाणी देखील आमच्याकडे नाही. साहेब आता तुम्हीच लवकर काहीतरी उपाय योजना करा... अशा व्यथा महिला शेतकऱ्यांनी मांडल्या.
अन् पावसातच साधला
शेतकऱ्यांशी संवाद
पाटोदा तालुक्यातील नायगाव येथे सायंकाळी ६:३२ वाजता मुख्यमंत्र्यांनी सिमेंट बंधाऱ्याच्या कामाची पहाणी केली. यावेळी अचानक पाऊस सुरू झाला. बंधाऱ्यावर शेतकरी जमले होते. सुरू झालेल्या पावसामुळे मुख्यमंत्री भीजत असल्याचे पाहून एका अंगरक्षकाने मुख्यमंत्र्याच्या डोक्यावर छत्री धरली. मात्र मुख्यमंत्र्यांनी छत्री हाटविण्यास सांगितल्याने पावसात भिजत-भिजतच शेतकऱ्यांशी संवाद साधला.
शेतकऱ्यांच्या बांधावर, बंधाऱ्यांवर जाऊन पहाणी करणारे पहिलेच मुख्यमंत्री आहेत, असे विधान बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दौऱ्या दरम्यान केले. मात्र १९७२ च्या भयाण दुष्काळाच्या दरम्यान तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आष्टी तालुक्यातील खडी फोडणाऱ्या मजुरांना त्यांच्या ठिकाणी जाऊन भेट दिली होती. याशिवाय माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी २०१४ मार्च दरम्यान गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पहाणी केली होती. याचा विसर पंकजा मुंडे यांना पडला असल्याचे दौऱ्यादरम्यान त्यांनी केलेल्या भाषणावरून जाणवले असल्याच्या प्रतिक्रीया उपस्थित शेतकऱ्यांमधून उमटल्या.
सौताडा येथे मुख्यमंत्र्यांचे आगमन झाल्यानंतर सकाळी आकरा पासून मुख्यमंत्री येणार म्हणून ताटकळत बसलेल्या शेतकऱ्यांशी मुख्यमंत्री संवाद साधणार तोच आष्टीचे आमदार भीमराव धोंडे व केजच्या संगीता ठोंबरे यांची मुख्यमंत्र्यासोबत फोटोशेषण करण्याची धडपड असल्याचे पहावयास मिळाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाटोदा तालुक्यातील सौताडा येथे बुधवारी महिला शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे, आ. आर. टी. देशमुख, आ. विनायक मेटे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम उपस्थित होते.

Web Title: The pains presented before the Chief Minister for the photo, Dhond,