सेबीने बंदी घातलेल्या एलएफएस शेअर ब्रोकिंगचा मालक ओडिशातून अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 12:36 IST2025-03-12T12:36:28+5:302025-03-12T12:36:34+5:30

मालकाच्या परस्पर राज्य प्रमुखांनी ब्रँचच्या नावावर उघडले खाते : १५ मार्चपर्यंत पोलिस कोठडी

Owner of LFS Share Broking, banned by SEBI, arrested from Odisha | सेबीने बंदी घातलेल्या एलएफएस शेअर ब्रोकिंगचा मालक ओडिशातून अटकेत

सेबीने बंदी घातलेल्या एलएफएस शेअर ब्रोकिंगचा मालक ओडिशातून अटकेत

छत्रपती संभाजीनगर : दोन टक्के व्याजदराचे आमिष दाखवून शेकडो जणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या एलएफएस ब्रोकिंग कंपनीचा मालक सय्यद जियाजूर रहेमानवर (रा. पश्चिम बंगाल) याला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. ओडिशातील कटक कारागृहातून त्याला ताब्यात घेण्यात आले.

देशभरात गाजत असलेल्या एलएफएस घोटाळ्याप्रकरणी शहरात २० फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल झाला. एलएफएस ब्रोकिंगचे शहरात काम पाहणाऱ्या विनोद बाळासाहेब माने व विनोद त्र्यंबक साळवे यांनी जिल्ह्यातील अनेकांना गुंतवणुकीसाठी भाग पाडले. शिवाय, १ ते ५ लाखांच्या गुंतवणुकीवर सुरक्षेखातर कन्फर्मेशन लेटर, पाच लाखांपेक्षा अधिकच्या गुंतवणुकीवर वचनबद्ध करारनाम्याचे आश्वासन दिले. जून २०२३ पर्यंत १० लाखांच्या गुंतवणुकीवर दीड ते दोन लाखांपर्यंत परतावा मिळाला. मात्र, जियाजुरच्या घोटाळ्यामुळे सेबीने कंपनीवर निर्बंध आणले.

२१ मार्चपर्यंत ताबा
वरिष्ठ निरीक्षक संभाजी पवार, उपनिरीक्षक अशोक अवचार तपास करत आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर व्यवस्थापक विनोद साळवेला अटक झाली. सय्यद जियाजूरवर देशभरात सहा हजार गुंतवणूकदारांच्या ६०० कोटींच्या फसवणुकीचा ठपका आहे. जुलै २०२४ पासून तो कटक कारागृहात होता. उपनिरीक्षक अवचार यांच्या पथकाने त्याला नुकतेच तेथील कारागृहातून ताब्यात घेतले. जिल्हा सत्र न्यायालयाने त्याला १५ मार्चपर्यंत पाेलिस कोठडी सुनावली. ओडिशाच्या स्थानिक न्यायालयाने त्याला २१ मार्चपर्यंत पुन्हा ओडिशा पोलिसांच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले.

राज्यात परस्पर खाते उघडले
जियाजूरसह अन्य राज्यांतील प्रमुख साेनल भक्ता (रा. गुजरात), सोमित्र सिन्हा, सौरव अधिकारी, सेजल मेगजी देसर चंद्रा, दिलीपकुमार मैती व शहरातील विनोद माने हे या गुन्ह्याचे आरोपी आहेत. कंपनी अडचणीत येत असताना या सर्वांनी कंपनीच्या मूळ खात्याव्यतिरिक्त स्थानिक शाखेच्या नावे बँक खाते उघडून त्याद्वारे पैशांचा व्यवहार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. 

Web Title: Owner of LFS Share Broking, banned by SEBI, arrested from Odisha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.