ओव्हरटेक करणे जीवावर बेतले; शिवशाही बसच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 12:06 IST2022-12-29T12:06:27+5:302022-12-29T12:06:59+5:30
बीड नगर राष्ट्रीय महामार्गावरील धानोरा नजीक झाला अपघात

ओव्हरटेक करणे जीवावर बेतले; शिवशाही बसच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार
- नितीन कांबळे
कडा (बीड) : बीड-नगर महामार्गावरील धानोरा जवळ दुचाकीस्वाराचा ओव्हरटेकच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या शिवशाही बसच्या समोरासमोर धडकेत जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज सकाळी साडेदहाच्या सुमारास झाला. मृताचे नाव रामदास मिसाळ ( ४८ ) असे असून तो जामखेड तालुक्यातील आनंदवाडी येथील रहिवासी आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रामदास मिसाळ हे जामखेडवरून नगरकडे दुचाकीवरून ( क्र. एम.एच १६, ए.के.२४३१) जात होते. बीड-नगर महामार्गावरील धानोराजवळ दुचाकीवरील मिसाळ समोरील गाडीला ओव्हरटेक करत होते. याच दरम्यान, पुण्यावरून नांदेडला जात असलेली शिवशाही बस (क्र. एम.एच.०९, ए.एफ.९७४९) समोरून आली. यावेळी दुचाकी आणि बसची समोरासमोर धडक झाली. यात दुचाकीस्वार रामदास मिसाळ यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच अंभोरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रोहित बेंबरे, अंमलदार शिवदास केदार , बाबुराव तांदळे, भरत माने, राजु कांबळे घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. शवविच्छेदन प्राथमिक आरोग्य केंद्र कडा येथे सुरू आहे.