छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील ३५७ जागांसाठी राज्यभरातून १.१५ लाखांवर अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 13:20 IST2025-07-30T13:20:10+5:302025-07-30T13:20:37+5:30
छाननी प्रक्रिया अद्याप सुरू असून ही सर्व भरती प्रक्रिया ऑनलाइन आहे.

छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील ३५७ जागांसाठी राज्यभरातून १.१५ लाखांवर अर्ज
छत्रपती संभाजीनगर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील (घाटी) ३५७ पदांसाठी राज्यभरातून तब्बल १.१५ लाखांहून अधिक उमेदवारांचे अर्ज आले. या पदांसाठी टीसीएस कंपनीकडून २५, २६ आणि २८ ऑगस्ट रोजी राज्यभरातील केंद्रावर ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार आहे.
वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्तरावर अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या मार्गदर्शनात ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. गट ड आणि समकक्ष ११ संवर्गासाठी होत असलेल्या भरतीसाठी ५ जून ते २४ जूनदरम्यान ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले. छाननी प्रक्रिया अद्याप सुरू असून ही सर्व भरती प्रक्रिया ऑनलाइन आहे. त्यासाठी टीसीएस या कंपनीकडून प्रक्रिया राबवण्यात येत आहे. सामान्यज्ञान, गणित-बुद्धिमत्ता, मराठी, इंग्रजी या ४ विषयांची परीक्षा असणार आहे. चुकीच्या उत्तरांचे गुण कापण्यात येणार नाहीत. ही परीक्षा ऑनलाइन, वस्तुनिष्ठ, बहुपर्यायी असणार आहे. राज्यभरातील विविध केंद्रांवर ही परीक्षा असणार आहे.