संतापजनक! गतिमंद विद्यार्थ्यास हातपाय बांधून कुकरच्या झाकणाने मारहाण; ६ कर्मचारी निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 15:10 IST2025-11-04T15:06:32+5:302025-11-04T15:10:10+5:30
विद्यालयातील एका गतिमंद विद्यार्थ्यास लाथाबुक्क्यांसह कुकरच्या झाकणाने दोन केअर टेकर्सनी मारहाण केेली. त्यावेळी तिथे अन्य चौघेजण हा प्रकार पाहात होते.

संतापजनक! गतिमंद विद्यार्थ्यास हातपाय बांधून कुकरच्या झाकणाने मारहाण; ६ कर्मचारी निलंबित
छत्रपती संभाजीनर : येथून जवळच असलेल्या मांडकी येथील निवासी गतिमंद विद्यालयातील गतिमंद विद्यार्थ्यास हातपाय बांधून कुकरच्या झाकणाने मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दोषी शिक्षक, केअर टेकर व कर्मचारी असे मिळून ६ जणांना निलंबित करण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी बाबासाहेब आरावत यांनी दिली. दरम्यान, या शाळेची मान्यताच रद्द करावी, अशी मागणी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी गाडे यांनी सोमवारी समाज कल्याण विभागाकडे केली आहे.
मांडकी गावातील चैतन्य कानिफनाथ निवासी गतिमंद विद्यालयात ५० दिव्यांग विद्यार्थी असून त्यांच्यासाठी २६ शिक्षक, केअर टेकर, शिपाई कार्यरत आहेत. या विद्यालयातील एका गतिमंद विद्यार्थ्यास लाथाबुक्क्यांसह कुकरच्या झाकणाने दोन केअर टेकर्सनी मारहाण केेली. त्यावेळी तिथे अन्य चौघेजण हा प्रकार पाहात होते. त्यांनी या घटनेची ना संस्थाचालकांकडे, ना समाज कल्याण विभागाकडे वाच्यता केली. हा प्रकार दाबून ठेवण्यास तेही जबाबदार आहेत. म्हणून मारहाण करणारे व तेथे उपस्थित असलेल्या सहा जणांना निलंबित करण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे, असे जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी बाबासाहेब आरावत यांनी सांगितले. दरम्यान, हे सहाही जण सध्या पसार आहेत.
आरोपी पसार, गुन्हा मात्र जामीनपात्र
जिल्ह्यातील एका निवासी गतिमंद विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्याच शाळेतील शिपाई व काळजीवाहकानेच मारहाण केल्याच्या घटनेतील आरोपी दीपक गाेविंद इंगळे (रा. मांडकी) व प्रदीप वामन देहाडे (रा. केराळा, ता. सिल्लोड) हे पसार झाले आहेत. २६ ऑक्टोबर रोजी सखाराम पोळ (६०, रा. कैलासनगर) यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल झाला. सदर व्हिडिओ तीन ते चार वर्षे जुना आहे. ज्या विद्यार्थ्याला मारहाण झाली, तो विद्यार्थी आता त्या शाळेत शिकत नसून तो राहत असलेला पत्ताही संस्थेकडे नसल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, यात दाखल गुन्हा जामीनपात्र असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
दुसऱ्या गुन्ह्यात अद्याप आरोपी निष्पन्न नाही
२ मुलांना मारल्याची घटना ताजी असताना नारेगाव परिसरातही एका गतिमंद मुलाला मारण्यात आले. महिनाभरापूर्वी घडलेल्या घटनेत चौकशी करून ३० ऑक्टोबर रोजी याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, गतिमंद मुलाला घटना तसेच मारणाऱ्या विषयी काहीच सांगता येत नसल्याने आरोपींना शोधणे पोलिसांसमोर आव्हान आहे.