छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी आमची मागणी कायम: अतुल सावे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 19:52 IST2024-12-23T19:52:31+5:302024-12-23T19:52:44+5:30
जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीमध्ये स्पर्धा; भाजप, शिंदेसेनेचा दावा

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी आमची मागणी कायम: अतुल सावे
छत्रपती संभाजीनगर : फडणवीस सरकारचे खातेवाटप झाल्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी भाजप आणि शिंदेसेनेत स्पर्धा लागली आहे. आम्हाला पालकमंत्रिपद मिळावे, ही मागणी कायम असल्याचे बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी रविवारी सांगितले. दरम्यान, शनिवारी समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी मीच पालकमंत्री होणार, असे स्पष्ट केले.
मंत्री सावे म्हणाले, जी खाते मिळाले आहेत, त्यावर मी १०० टक्के समाधानी आहे. तीन खाते माझ्याकडे आहेत. सोलार एनर्जीमध्ये काम करण्यास खूप वाव आहे. या खात्याचे बजेट खूप मोठे आहे. तिन्ही खाते उत्तम आहेत. ओबीसी कल्याण खात्यामध्ये काम करताना अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. दुग्धविकास आणि सोलर एनर्जी खात्यामध्ये चांगले काम करेन. प्रत्येक घरावर सोलार एनर्जीतून वीज मिळावी, हे पंतप्रधान मोदी यांचे धोरण आहे. ते धोरण राज्यात पूर्ण ताकदीने राबविणार, असे सावे यांनी स्पष्ट केले.
आमची मागणी कायम
पालकमंत्रिपदाची मागणी केलीच आहे. नेते जे पालकमंत्री ठरवतील, त्यांना पद मिळेल. परंतु, आमची मागणी कायम आहे. शिरसाट झाले, तर आनंदच असेल, आम्हाला दु:ख होणार नाही. आम्हाला इतर दुसरा जिल्हा मिळेल.
- अतुल सावे, ओबीसी कल्याण मंत्री
मुंबईत शिष्टमंडळ भेटणार..
पालकमंत्रिपद कुणाला द्यायचे, याचा निर्णय मुंबईत होणार आहे. खातेवाटप जाहीर झाल्यानंतर लगेचच पालकमंत्री जाहीर होणार नाहीत. दोन-चार दिवसांत बैठक होणार असून, भाजपचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून पदाची मागणी करणार आहे.
- शिरीष बोराळकर, शहराध्यक्ष भाजप