पालकमंत्री संदीपान भुमरेंना दणका; बिडकीन, आडुळमध्ये उद्धवसेनेचा सरपंच...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 16:10 IST2022-12-20T16:09:34+5:302022-12-20T16:10:28+5:30
पैठण विधानसभा मतदारसंघातील आडुळ आणि बिडकीन ही दोन महत्वाची आणि मोठी गावे आहेत.

पालकमंत्री संदीपान भुमरेंना दणका; बिडकीन, आडुळमध्ये उद्धवसेनेचा सरपंच...
औरंगाबाद :जिल्ह्यातील २१६ ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल हाती यायला सुरूवात झाली आहे. आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालांमध्ये राज्याचे रोहयो तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या मतदारसंघातील बिडकीन आणि आडुळ ग्रामपंचायतीमध्ये विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे सरपंच विजयी झाले आहेत.
पैठण विधानसभा मतदारसंघातील आडुळ आणि बिडकीन ही दोन महत्वाची आणि मोठी गावे आहेत. बाजारपेठ असलेल्या या गावाचा कारभार आता ठाकरे गटाकडे गेल्यामुळे भुमरेंना हा मोठा धक्काच म्हणावा लागेल.
बिडकीन येथे प्रचार संपल्यानंतर भुमरे यांनी शिंदे गटाच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन करत आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप भुमरे यांच्यावर झाला होता. यावर मी ग्रामपंचायतीच्या प्रचाराला जात नाही, असे म्हणत भुमरेंनी आरोप फेटाळले होते. याच तालुक्यातील बिडकीनच्या सरपचंपदाच्या निवडणुकीत भुमरेंच्या गटाला पराभव पत्करावा लागला आहे.
आडूळ ग्रामपंचायतमध्ये महाविकास आघाडी ग्रामविकास पॅनलचे १० तर शिवशाही ग्रामविकास पॅनलचे ५ उमेदवार विजयी झाले आहेत. आज निकाल जाहीर होताच आडूळ गावात फटाके फोडून तसेच गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मातबरांना पराभूत व्हावे लागले. जनतेतून सरपंच निवडला जाणार असल्याने सरपंच पदाची माळ कोणत्या उमेदवारांच्या गळ्यात पडते याकडे सर्व ग्रामस्थांचे लक्ष लागून होते. बबन भावले २३६४ मते घेऊन विजयी झाले. तर कासाबाई कोल्हे यांना २००२ मते मिळाली. महाविकास आघाडी ग्रामविकास पॅनलचे प्रमुख हाजी मुक्तार मौलाना, पोलीस पाटील भाऊसाहेब पिवळ, युवासेनेचे जिल्हाप्रमुख शुभम पिवळ यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढली गेली.
प्रभाग क्र १- अहिल्याबाई भावले,शिलाबाई पिवळ,राहुल बनकर,
प्रभाग क्र २ - भाऊसाहेब पिवळ,मोसीन शेख,द्वारकाबाई पिवळ
प्रभाग क्र ३- शेख जाहेर,सोफिया पठाण, हसीनाबी शेख,
प्रभाग क्र ४- शेख अजीम,अलका बनकर,शेख नाजमीनबी,
प्रभाग क्र ५ - हिरालाल राठोड,कौसाबाई राठोड,विलास चव्हाण