२५० सदस्य केले तरच पदाधिकारी होता येणार; भाजपच्या अजेंड्यावर मिशन महापालिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 17:34 IST2025-01-06T17:34:22+5:302025-01-06T17:34:51+5:30
शहरातील एकूण १ हजार २२७ बूथ वर हे अभियान राबविण्यात येणार आहे.

२५० सदस्य केले तरच पदाधिकारी होता येणार; भाजपच्या अजेंड्यावर मिशन महापालिका
छत्रपती संभाजीनगर : आगामी महापालिकेसह जिल्हा परिषदेच्या निवडणुका भाजपच्या अजेंड्यावर आहेत. त्यामुळे मिशन मोडवर पक्षाने सदस्य नोंदणी अभियान हाती घेतले असून, पालिकेत एकहाती सत्ता आणण्यासाठी रविवारी दिवसभर शहरातील विविध वॉर्डांमध्ये नोंदणी मोहीम कार्यक्रम घेण्यात आले. २५० सदस्य केले तरच पदाधिकारी होता येईल, असे लक्ष्य कार्यकर्त्यांना देण्यात आले असून, त्यातून शत-प्रतिशत भाजप हा नारा देण्यात आला.
शहरातील सर्व मंडळांतील प्रमुख चौकात ऑनलाईन सदस्य नोंदणी अभियानास सुरुवात झाली. संघटनात्मक बांधणीसाठी सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. शहरातील तीन विधानसभा मतदारसंघासह फुलंब्री विधानसभेतील दहा वाॅर्डात सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आले. हर घर भाजपा या संकल्पनेतून शत-प्रतिशत भाजपाकडे वाटचाल करीत असल्याचे मत भाजप शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले.
सरचिटणीस संजय केणेकर, बसवराज अप्पा मंगरुळे, रामेश्वर भादवे, बापू घडामोडे, शहर सरचिटणीस लक्ष्मीकांत थेटे, अनिल मकरिये, महेश माळवतकर, जालिंदर शेंडगे, दीपक ढाकणे, अमित देशपांडे, राजेश मेहता, प्रशांत नांदेडकर, दामोधर शिंदे, मुकुंद दामोदरे, बालाजी मुंढे, ताराचंद गायकवाड, शंकर म्हात्रे, विवेक राठोड, नितीन चित्ते, लक्ष्मण शिंदे, अरुण गुदगे, नंदू गवळी, अक्षय बसैय्ये, भाऊसाहेब ताठे, बंटी चावरिया, माधुरी अदवंत, अमृता पालोदरकर, गीता आचार्य, साधना सुरडकर, शालिनी बुंधे, रूपाली वाहुळे, लता दलाल, उज्ज्वला दहीफळे, मीना मीसाळ, रेखा जैस्वाल, आदी उपस्थिती होती.
१ हजार २२७ बूथवर नोंदणी...
यावेळी ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे म्हणाले, शहर सदस्य नोंदणीत मराठवाडा सर्वांत पुढे आहे. परंतु, आता राज्यात प्रथम क्रमांकावर सदस्य नोंदणी करायची आहे. प्रत्येक व्यक्तीस २५० सदस्य करणे आवश्यक आहे, तरच तो पदाधिकारी होऊ शकेल. प्रत्येकाने किमान २५० सदस्य करावेत असे, आदेश प्रदेश कार्यालयाने दिले आहेत. खा. डॉ. भागवत कराड म्हणाले, प्रत्येक पदाधिकाऱ्यांकडून २५० सदस्य नोंदणी होणे अपेक्षित आहे. वरिष्ठ पातळीवरून तसे आदेश देण्यात आले आहेत. शहरातील एकूण १ हजार २२७ बूथ वर हे अभियान राबविण्यात येणार आहे.