ऑनलाइन फसवणूक टळली; मुख्याध्यापकाचे दीड लाख सायबर पोलिसांच्या सतर्कने परत मिळाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2021 12:49 IST2021-11-08T12:48:23+5:302021-11-08T12:49:14+5:30
सायबर गुन्हेगारांनी केवायसी अपडेट करून क्रेडिट कार्डची मर्यादा वाढविण्यासाठी लिंक पाठवली होती.

ऑनलाइन फसवणूक टळली; मुख्याध्यापकाचे दीड लाख सायबर पोलिसांच्या सतर्कने परत मिळाले
औरंगाबाद : ऐन दिवाळीच्या सणाच्या काळात एका आरोपीने मुख्याध्यापकाच्या मोबाइलवर लिंक पाठवून बँक खात्याची केवायसी करणे आणि क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवण्याची थाप मारली. त्या जाळ्यात मुख्याध्यापक अडकले आणि १ लाख ४५ हजार रु. त्यांच्या खात्यातून वळते झाले. मुख्याध्यापकांनी तात्काळ सायबर पोलिसांकडे धाव घेतली. सायबर पोलिसांनी हे पैसे परत मिळवून दिल्याची घटना शनिवारी घडल्याचे सायबर गुन्हे शाखेचे निरीक्षक गौतम पातारे यांनी सांगितले.
सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र कहाटे हे एका शाळेत मुख्याध्यापक आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या खात्यावर होम लोनची मोठी रक्कम जमा झाली होती. मागील आठवड्यात सायबर आरोपींनी कहाटे यांच्या मोबाइलवर मेसेज पाठवून केवायसी अपडेट करून क्रेडिट कार्डची मर्यादा वाढविण्यासाठी लिंक पाठवली होती. कहाटे यांना काही ठिकाणी रक्कम द्यायची असल्याने त्यांनी क्रेडिट कार्डची मर्यादा वाढविण्यासाठी लिंकमध्ये सांगितल्याप्रमाणे माहिती दिली. त्यानंतर आराेपींनी कहाटे यांच्या खात्यातून १ लाख ४५ हजार ६६२ रुपये लंपास केले.
हा प्रकार रविवारी कहाटे यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी सायबर शाखेकडे धाव घेतली. पोलीस अंमलदार सुशांत शेळके व वैभव वाघचौरे यांनी ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. सायबर शाखेचे निरीक्षक गौतम पातारे यांनी तात्काळ ई-वॉलेट कंपनीच्या नोडल ऑफिसरशी संपर्क साधला. ज्या खात्यात पैसे गेले होते, ते खाते सील करण्यात आले. त्यानंतर ही रक्कम कहाटे यांच्या खात्यात परत करण्यात आली. ही कामगिरी उपायुक्त अपर्णा गिते, सहायक उपायुक्त विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पातारे, अंमलदार सुशांत शेळके, वैभव शेळके यांच्यासह सायबर पोलिसांनी केली.
बँक खात्याची माहिती देऊ नका
अनोळखी फोन कॉल्स, मेसेज किंवा लिंकवर विश्वास ठेवून आपल्या बँक खात्याची कोणतीही वैयक्तिक माहिती अनोळखी व्यक्तीला देऊ नका. कोणतीही बँक अशा प्रकारची माहिती फोनद्वारे विचारत नाही. बँक खात्याविषयी माहितीकरिता बँकेच्या शाखेत जाऊनच खात्री करावी, असे आवाहन निरीक्षक गौतम पातारे यांनी केले आहे. फसवणूक झाल्यास तात्काळ सायबर शाखेशी संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले.