शेतकरी संघटनेकडून शासनाला कांद्याचा अहेर
By Admin | Updated: May 16, 2016 23:56 IST2016-05-16T23:55:20+5:302016-05-16T23:56:08+5:30
हिंगोली : सरकारने कांदा उत्पादकांना उध्वस्त करणारे निर्णय घेतले असून कांद्याच्या निर्यातीवर शुल्क आकारणी करणारा निर्णय तातडीने रद्द करावा व राज्य सरकारने

शेतकरी संघटनेकडून शासनाला कांद्याचा अहेर
हिंगोली : सरकारने कांदा उत्पादकांना उध्वस्त करणारे निर्णय घेतले असून कांद्याच्या निर्यातीवर शुल्क आकारणी करणारा निर्णय तातडीने रद्द करावा व राज्य सरकारने २० रूपये प्रति किलो दराने कांदा खरेदीसाठी केंद्र सुरू करावे, याासह इतर मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी १६ मे रोजी शेतकरी संघटनेच्या वतीने आगळे-वेगळे आंदोलन करण्यात आले. हिंगोली येथे उपविभागीय महसूल अधिकारी राहुल खांदेभराड यांना कांद्याचा अहेर करण्यात आला.
शेतकरी संघटना महिला आघाडीच्या माजी प्रदेशाध्यक्षा अंजलीताई अरूण पातूरकर, गयाबाई शेषराव राखोंडे, सत्यभामाबाई तुकाराम कऱ्हाळे, पद्माबाई खंडबाराव पोले, विमल नामदेव काळे, कौशल्याबाई उत्तमराव वाबळे, शिलाबाई प्रल्हाद राखोंडे, कौसल्याबाई उत्तमराव वाबळे, शीलाबाई प्रल्हाद राखोंडे, गीताबाई विठ्ठल वाबळे, ज्योती मुटकुळे यांनी हे आंदोलन केले. केंद्रीय कार्यकारिणी सदस्य ब.ल.तामसकर, देवीप्रसाद ढोबळे, उत्तमराव वाबळे, खंडबाराव नाईक, परबतराव माने, प्रल्हाद राखोंडे, खंडबाराव पोले, विठ्ठलराव वाबळे, बाळासाहेब वाबळे, संतोष वाबळे, शेषराव राखोंडे, अरूण पातूरकर, केशव ढोबळे, काशिनाथ जाधव यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यंदा कांद्याचे ठोक बाजारभाव प्रति किलो २ रूपयांपर्यंत खाली घसरले आहेत. कांद्याच्या निर्यातीवर शुल्क आकारणी करणारा तसेच कांदा खरेदीदारांवर साठ्याची मर्यादी घालणारा शासनाचा निर्णय कांदा उत्पादकांना उध्वस्त करणारा ठरत आहे. हा निर्णय तातडीने रद्द करून कांदा निर्यातीस प्रोत्साहन द्यावे, शेतकऱ्यांना तातडीने पीककर्जाच्या बोज्यातून मुक्तता करावी व आजपर्यंत शेतकऱ्यांच्या केलेल्या लुटीची रक्कम परत करावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी दुपारी २ वाजता जिल्हा प्रशासनामार्फत शासनाला कांद्याचा आहेर देण्याचे प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. शेतकरी संघटना, महिला आघाडी व शेतकरी युवा आघाडीतर्फे पुकारलेल्या या आंदोलनात जिल्हाभरातील कार्यकर्त्यांनी भाग घेतला. (प्रतिनिधी)