एकतर्फी प्रेमातून रस्त्यात गाठले, जीवे मारण्याची धमकी; त्रासामुळे तरुणीवर शिक्षण सोडण्याची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 19:46 IST2025-12-02T19:45:30+5:302025-12-02T19:46:25+5:30
टवाळखोरांकडून सतत पाठलाग, रात्री घरासमोर जाऊन घातला धिंगाणा; लग्न केल्यास जीवे मारण्याची धमकी

एकतर्फी प्रेमातून रस्त्यात गाठले, जीवे मारण्याची धमकी; त्रासामुळे तरुणीवर शिक्षण सोडण्याची वेळ
छत्रपती संभाजीनगर : दोघांची महाविद्यालयातच ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. मात्र, काही वेळांतच तरुणीला मित्राचे वागणे खटकायला लागले. त्याचा खरा चेहरा समोर आल्यानंतर ती त्याच्यापासून दूर गेली. मात्र, ज्याला मित्र मानले, त्याने नंतर एकतर्फी प्रेमातून सतत पाठलाग केला. तिचे घराबाहेर पडणेही अवघड केले. त्यामुळे तरुणीवर अशरक्ष: शिक्षण सोडण्याची वेळ आली. हेमंत संजय काकड (रा. सातारा) असे आरोपीचे नाव असून चिकलठाणा पोलिसांनी त्याला अटक केल्याचे पोलिस निरीक्षक रवीकिरण दरवडे यांनी सांगितले.
२१ वर्षीय तरुणी कुटुंबासह चिकलठाणा पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहते. तिचे वडील शेतकरी आहेत. काही महिन्यांपूर्वी तिची हेमंतसोबत ओळख झाली होती. त्यानंतर ते सतत संपर्कात होते. मात्र, काही दिवसांत तरुणीला त्याचे वागणे, त्रास खटकायला लागला. एकतर्फी प्रेमातून हेमंतने तरुणीवर दबाव टाकण्यास सुरुवात केली. तिला नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तरुणीने त्याच्यापासून अंतर ठेवण्यास सुरू केले. फेब्रुवारी २०२५ मध्ये तिने त्याला स्पष्टपणे सांगून बोलणे बंद केले. तिच्या कुटुंबाने हेमंतच्या कुटुंबाला ही बाब कळवून संपर्क बंद करण्यास सांगितले.
रस्त्यात गाठले, लहान भावाचाही पाठलाग
हेमंतने मात्र पिच्छा पुरवला. बोलण्याचा हट्ट करत तुझे कोणासोबतही लग्न होऊ देणार नाही, अशा धमक्या दिल्या. लग्न केल्यास पतीलाही मारून टाकण्याचा इशारा दिला. तरुणी तणावाखाली होती. २९ नोव्हेंबरला हेमंतने मित्र प्रकाश रतन जोगदंड याच्या मदतीने तिच्या भावाचा पाठलाग केला. त्यानंतर रात्री १२ वाजता थेट घराच्यासमोर जात धिंगाणा घातला. छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी दिली. घटनेची माहिती कळताच चिकलठाणा पोलिसांनी धाव घेत हेमंतला अटक केली. हेमंतची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक रवीकिरण दरवडे यांनी सांगितले. हेमंतवर यापूर्वी सातारा पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. पोलिस उपनिरीक्षक श्रीनिवास धुळे अधिक तपास करत आहेत.