कारागृहात नेताना उलटीचा बहाणा केला, गाडी थांबताच आरोपी हातकडीसह पळाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 12:07 IST2022-08-04T12:07:31+5:302022-08-04T12:07:51+5:30
पोलिसांनी पाठलाग करूनही आरोपी सापडला नाही : छावणी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु आहे

कारागृहात नेताना उलटीचा बहाणा केला, गाडी थांबताच आरोपी हातकडीसह पळाला
औरंगाबाद : चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी आरोपी हर्सूल कारागृहात ठेवण्यासाठी घेऊन येत असताना गोलवाडी फाट्याजवळ आरोपीने उलटी होत असल्याचे सांगितले. त्यामुळे गाडी थांबविल्यानंतर आरोपीने अंधाराचा फायदा घेत आरोपीने हातकडीसह पळ काढल्याचा प्रकार उघडकीस आला. शिल्लेगाव पोलिसांनी आरोपीचा पाठलाग केल्यानंतरही आरोपी सापडला नाही. त्यामुळे छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
प्रवीण सुभाष राऊत (३१, रा. महेबूबखेडा, ता. गंगापूर) असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. शिल्लेगाव ठाण्यातील हवालदार आनंद आरसुडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार १ जुलै रोजी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी प्रवीण राऊत याचा हर्सूल कारागृहातून ताबा घेत गंगापूर न्यायालयात आरोपीला हजर केले. न्यायालयीन कामकाज झाल्यानंतर आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावल्यामुळे पुन्हा हर्सूल कारागृहात आरोपी दाखल करण्यासाठी तपासी अंमलदारासह इतर दोन कर्मचारी त्यास घेऊन औरंगाबादच्या दिशेने येत होते.
गोलवाडी फाट्याजवळील नाक्यावर रात्री साडेआठ वाजता आल्यानंतर आरोपीने उल्टी होत असल्याचे पोलिसांना सांगितले. तेव्हा वाहन रस्त्यावर थांबवले. आरोपी हातकडीसह खाली उतरला. तेव्हा त्या हातकडीची दाेरी तपासी अंमलदाराच्या हातात होती. तेव्हा आरोपीने तपासी अंमलदाराच्या हाताला झटका देऊन रोडच्या विरुद्ध दिशेने धूम ठोकली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे पोलीस कर्मचारीही भांबावून आरोपीच्या मागे पळू लागले. मात्र आरोपीने डोंगराकडे धाव घेत झाडाझुडपातून धूम ठोकली. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. अधिक तपास सहायक उपनिरीक्षक सुरेश जिरे करीत आहेत.