जुन्या कायगावात भरधाव ट्रकने दुचाकीस्वारास चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 19:38 IST2021-05-10T19:37:02+5:302021-05-10T19:38:37+5:30
निष्काळजीपणे ट्रक चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रकचालकावर गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जुन्या कायगावात भरधाव ट्रकने दुचाकीस्वारास चिरडले
कायगाव : औरंगाबाद-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील जुन्या कायगावात ट्रकने दुचाकी स्वाराला उडविल्याने दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला. टी-पॉइंटवर सोमवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. प्रदीप कैलास मगर असे मृताचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चेक पोस्टजवळ औरंगाबादहून अहमदनगरकडे जाणाऱ्या ट्रकने (एमएच १६ सीसी ७४६७) जामगाव येथून प्रवरासंगमकडे (ता.नेवासा) दुचाकीवर जाणाऱ्या प्रदीप कैलास मगर (२३, रा.जामगाव, ता.गंगापूर) याला जोरदार धडक दिली. यात प्रदीप ट्रकच्या टायरखाली सापडला. त्याच्या अंगावरून ट्रकचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
यावेळी चेकपोस्टवर उपस्थित असलेल्या पोलीस नाईक संदीप डमाळे, राहुल वडमारे, गृहरक्षक रामेश्वर मंडलीक आदींनी तत्काळ मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. यानंतर, शवविच्छेदन करण्यात आले. निष्काळजीपणे ट्रक चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रकचालकावर गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संबंधित ट्रक गंगापूर पोलीस ठाण्यात जमा केला असून, चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक औटे करीत आहेत.