बापरे! पैठण रोडवर २० किमी रस्त्याच्या खाली जलवाहिनी; फुटली तर ५० मीटर उंच उडेल वाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 19:48 IST2024-12-17T19:48:07+5:302024-12-17T19:48:34+5:30
पैठण रोडवर २० किमी रस्त्याच्या खाली जलवाहिनी

बापरे! पैठण रोडवर २० किमी रस्त्याच्या खाली जलवाहिनी; फुटली तर ५० मीटर उंच उडेल वाहन
छत्रपती संभाजीनगर : शहराची तहान भागविण्यासाठी जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत रस्त्याच्या कडेला टाकण्यात आलेल्या जलवाहिनीसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. जर भविष्यात ही जलवाहिनी फुटली तर तेथून जाणारे वाहन किमान ४० ते ५० मीटरपर्यंत उडण्याची शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तविली. त्यामुळे २७४० कोटी रुपयांच्या प्रकल्पावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंतचे अंतर ३९ किमी आहे. २५०० मिमी व्यासाची जलवाहिनी ३४ किमीपर्यंत टाकण्यात आली. मुख्य रस्ता सोडून नॅशनल हायवेने ठरवून दिलेल्या ७ मीटर बाजूला जलवाहिनी टाकण्यात आली. आता जलवाहिनीच्या वर २० किमी कॅरेज वे येत आहे. या रस्त्याच्या खाली आलेल्या जलवाहिनीवरून वाहतूक सुरू राहील. भविष्यात जलवाहिनी फुटली तर पाण्याच्या दाबाने एखादे वाहन ५० मीटर उंच फेकले जाईल. ही परिस्थिती आता अधिकाऱ्यांच्या लक्षात आली आहे. आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने कॅरेज वे रस्ता शिफ्ट करण्याची मागणी न्यायालयात केली आहे. यावरून नॅशनल हायवे आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यात समन्वय नाही, असे स्पष्ट होते. मार्च २०२५ पर्यंत शहरात पाणी येईल, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. हा अंदाज चुकीचा होता.
या प्रश्नांची उत्तरे कोण देणार?
-२५०० मिमी व्यासाची मोठी जलवाहिनी टाकताना नॅशनल हायवेला ती चुकीच्या ठिकाणी टाकली, हे लक्षात आले नाही का?
- मुख्य रस्त्याच्या बाजूला ७ मीटर अंतर सोडून जलवाहिनी टाकण्याची परवानगी नॅशनल हायवेने का दिली?
-जलवाहिन्या कॅरेज वे खाली येत असल्याचे लक्षात येताच काम का थांबविण्यात आले नाही?
- आता २० किमी अंतरावरील जलवाहिन्या हलवणे मजीप्राला शक्य आहे का? कारण जलवाहिन्यांना वेल्डिंग केलेली आहे.
-शहरात पाणी येण्यास आणखी बराच विलंब होईल, याला जबाबदार कोण?