बापरे, दर चार दिवसांत तिघींना गर्भाशय मुखाचा कॅन्सर; घाबरू नका, उपचार शक्य
By संतोष हिरेमठ | Updated: January 9, 2026 18:05 IST2026-01-09T18:05:23+5:302026-01-09T18:05:41+5:30
गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग जागरूकता महिना विशेष; खासगीत लस, ‘सरकारी’त प्रतीक्षाच

बापरे, दर चार दिवसांत तिघींना गर्भाशय मुखाचा कॅन्सर; घाबरू नका, उपचार शक्य
छत्रपती संभाजीनगर : शासकीय कर्करोग रुग्णालयात (राज्य कर्करोग संस्था) दर चार दिवसांत तीन महिलांना गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरचे निदान होत आहे. एकीकडे आकडे धडकी भरवणारे असले तरी दुसरीकडे हा कर्करोग वेळेवर ओळखला तर पूर्णपणे टाळता येऊ शकतो. प्रतिबंधात्मक लसही आली आहे. मात्र ही लस सध्या खासगी रुग्णालयातच उपलब्ध असून, सरकारी रुग्णालयात मिळण्याची प्रतीक्षाच आहे.
दरवर्षी जानेवारी हा गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविषयी जनजागृती करणारा महिना म्हणून साजरा होतो. महिलांनी लक्षणांकडे दुर्लक्ष न करता नियमित तपासणी करणे हाच या आजाराविरोधातील सर्वात मोठा उपाय असल्याचे आरोग्य यंत्रणा सांगत आहे. रुग्णाच्या उपचारासाठी अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्री कर्करोग विभागप्रमुख डॉ. अर्चना राठोड, किरणोपचारशास्त्र विभागप्रमुख डाॅ. बालाजी शेवाळकर आदी प्रयत्नशील आहेत.
वर्षभरात किती रुग्ण?
शासकीय कर्करोग रुग्णालयात २०२५ मध्ये २८६ महिलांना गर्भाशय मुखाच्या कॅन्सरचे निदान झाले. यात तिसऱ्या, चौथ्या स्टेजमध्ये येणाऱ्या महिलांचे प्रमाण अधिक आहे.
हा कर्करोग होण्याची कारणे...
- ह्युमन पॅपिलोमा व्हायरस हा या कर्करोगाचा सर्वात मोठा कारणीभूत घटक आहे.
- वैयक्तिक शारीरिक स्वच्छता राखण्यास अडचण.
- दीर्घकाळ गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर.
- कमकुवत रोगप्रतिकारशक्ती.
- तंबाखूचे सेवन.
- नियमित आरोग्य तपासणीचा अभाव.
- असुरक्षित लैंगिक संबंध. कमी वयात लग्न.
- कुपोषण.
टाळता येणारा कर्करोग
हा टाळता येणारा कर्करोग आहे. ९ ते १४ वर्षांपर्यंतच्या मुलींचे एचपीव्ही लसीकरण होणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक महिलेने वयाच्या ३० वर्षांपासून वर्षातून एकदा चाळणी परीक्षण शासकीय रुग्णालयात करून घ्यायला हवे. लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.
- डॉ. अर्चना राठोड, स्त्री कर्करोग विभागप्रमुख, शासकीय कर्करोग रुग्णालय
महिलांची स्क्रीनिंग
भारतात गर्भाशयाचा कर्करोग हा महिलांमधील दुसरा सर्वात सामान्य कर्करोग आहे. केंद्र सरकारने ९ ते १४ वयोगटातील मुलींना ‘एचपीव्ही’ लस मोफत उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. राष्ट्रीय आरोग्य मोहिमेंतर्गत ३५ वर्षांवरील महिलांची तपासणी (स्क्रीनिंग) होत आहे.
- डाॅ. अपर्णा राऊळ, अध्यक्ष, सर्व्हाईकल कॅन्सर अवरनेस कमिटी- ‘आयएमए’
प्रशिक्षण पूर्ण, लवकरच लस
‘एचपीव्ही’ लसीसंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले आहे. लवकरच ही लस उपलब्ध होईल. पहिल्या टप्प्यात १४ ते १५ वर्षे वयोगटातील मुलींना ही लस देण्यात येईल. त्यानंतर ९ ते १४ वर्षांच्या मुलींना दिली जाईल.
- डाॅ. अभय धानोरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी