मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान ओबीसी कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 12:08 IST2025-09-17T12:05:12+5:302025-09-17T12:08:06+5:30
या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत याला 'हुतात्म्यांचा अपमान' असे संबोधले.

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान ओबीसी कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
छत्रपती संभाजीनगर: आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणावेळी ओबीसी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत घोषणाबाजी करणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले. या घटनेवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत याला 'हुतात्म्यांचा अपमान' असे संबोधले.
आज छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा होत होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आले. स्मृतीस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून त्यांनी स्वातंत्रसैनिकांना आदरांजली वाहिली. त्यानंतर, जेव्हा मुख्यमंत्री भाषणासाठी उभे राहिले, त्याचवेळी काही कार्यकर्त्यांनी गोंधळ सुरू केला.
'हैदराबाद गॅझेट रद्द करा' आणि ‘भुजबळ झिंदाबाद’च्या घोषणा
प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार, रामभाऊ कोंडाजी पेरकर (७०, समाजसेवक), शिवाजी बाबुराव गाडेकर (५९, नोकरी), आणि अशोक सिंग किसन सिंग शेवगण (६२, शेती) यांनी अचानक काळे रुमाल फडकवत घोषणाबाजी सुरू केली. त्यांनी ‘हैदराबाद गॅझेट रद्द झालेच पाहिजे’, ‘ओबीसी आरक्षणाला धक्का देणारे सरकार मुर्दाबाद’ आणि ‘छगन भुजबळ झिंदाबाद’ अशा घोषणा दिल्या.
मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला संताप
या प्रकारानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “मला या गोष्टीचं अतिशय दुःख आहे. आज आपण मुक्तीसंग्राम दिनाचा कार्यक्रम करतोय. अशा कार्यक्रमांमध्ये काही लोक येतात आणि घोषणाबाजी करतात, हा खऱ्या अर्थाने मराठवाडा मुक्तीसंग्रामातील स्वातंत्रसैनिकांचा मोठा अपमान आहे. केवळ प्रसिद्धीसाठी हे केलं जातंय. मी यावर फार काही बोलणार नाही. ईश्वर त्यांना सुबुद्धी देवो."
पोलिसांनी घेतले ताब्यात
या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत घोषणाबाजी करणाऱ्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणाची चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. मराठा आरक्षणावरून सुरू असलेल्या वादाचे पडसाद आता थेट शासकीय कार्यक्रमांमध्येही उमटत आहेत, हे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. यामुळे राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण अधिकच तापल्याचे दिसून येत आहे.