आता ‘ईडी’ची ‘पिडा’ कंत्राटदारांच्या मानगुटीवर, चौघांना समन्स बजावले
By मुजीब देवणीकर | Updated: March 25, 2023 19:10 IST2023-03-25T19:09:50+5:302023-03-25T19:10:16+5:30
पंतप्रधान आवास योजनेत सिटी चौक पोलिस ठाण्यात एक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

आता ‘ईडी’ची ‘पिडा’ कंत्राटदारांच्या मानगुटीवर, चौघांना समन्स बजावले
छत्रपती संभाजीनगर : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत निविदा घोटाळ्याची सखोल चौकशी ‘ईडी’कार्यालयाकडून करण्यात येत आहे. आता ईडीने चार कंत्राटदारांना समन्स बाजवल्याची माहिती सूत्रांनी दिली. मागील चार दिवसांपासून चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या उपायुक्त अपर्णा थेटे शुक्रवारी शहरात दाखल झाल्या. महापालिकेत अन्य अधिकाऱ्यांना ईडीने बोलावल्याची अफवा पसरली होती.
पंतप्रधान आवास योजनेत सिटी चौक पोलिस ठाण्यात एक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचप्रमाणे ‘ईडी’ने स्वतंत्रपणे या प्रकरणाची चौकशी सुरू केली. १७ मार्च रोजी ईडीच्या पथकाने शहरात धाडी टाकल्या होत्या. मनपातून निविदा प्रक्रियेची कागदपत्रे ताब्यात घेतली होती. उपायुक्त अपर्णा थेटे यांना सोमवार २० मार्च रोजी ईडी कार्यालयात बोलावले. त्यांचा जवाब नोंदवण्यात आला. ईडीच्या अधिकाऱ्यांनी निविदा प्रक्रियेतील या अधिकाऱ्यांकडून समजून घेतली, निविदेतील अटी- शर्थींबद्दल सखोल चौकशी केली. सर्वेक्षण करणाऱ्या एजन्सीच्या प्रतिनिधींना देखील ईडीने समन्स बजावून चौकशीसाठी बोलावून घेतल्याची माहिती समोर येत आहे.