आता छत्रपती संभाजीनगरावर असेल ड्रोनची नजर, पोलिसांना स्मार्ट सिटीकडून मिळाले तीन ड्रोन
By सुमित डोळे | Updated: September 22, 2023 16:17 IST2023-09-22T16:16:02+5:302023-09-22T16:17:20+5:30
स्मार्ट सिटीकडून दोन किलोमीटर रेडियसचे पोलिसांना तीन ड्रोन मिळाले

आता छत्रपती संभाजीनगरावर असेल ड्रोनची नजर, पोलिसांना स्मार्ट सिटीकडून मिळाले तीन ड्रोन
छत्रपती संभाजीनगर : कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास, तसेच मोर्चे, आंदोलनादरम्यान जमावावर नजर ठेवण्यासाठी स्मार्ट सिटीकडून शहर पोलिसांना तीन ड्रोन देण्यात आले. पोलिस आयुक्त मनोज लोहिया, मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांच्या उपस्थितीत संवेदनशील समजल्या जाणाऱ्या क्रांतीचौक, सिटीचौक व जिन्सी पोलिस ठाण्यांना ते सुपूर्द करण्यात आले.
आयुक्त लोहिया यांनी शहर पोलिस दलाला तांत्रिकदष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी चार ते पाच अद्ययावत ड्रोन मिळण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव ठेवला होता. महत्त्वाचे बंदोबस्त, मिरवणुका, सण, उत्सवादरम्यान गर्दीवर नियंत्रण ठेवणे, लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनची आवश्यकता होती. सायबर पोलिसांकडे यापूर्वी दोन ड्रोन आहेत. आता स्मार्ट सिटीकडील दोन किलोमीटरच्या अंतरापर्यंत रेकॉर्डिंग करू शकणारे तीन ड्रोन प्राप्त झाले आहेत. यावेळी निरीक्षक निर्मला परदेशी, संतोष पाटील, रामेश्वर रेंगे, प्रवीणा यादव, मनपाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.