आता अगदी मनसोक्त करा प्रार्थनास्थळी फुला-फळांची उधळण, तेही मोफत
By साहेबराव हिवराळे | Updated: July 22, 2023 18:55 IST2023-07-22T18:54:49+5:302023-07-22T18:55:07+5:30
सामाजिक वनीकरण विभागाचा अनोखा उपक्रम; १ लाख ३५ हजार विविध फळझाडे, फुलझाडांची होणार लागवड

आता अगदी मनसोक्त करा प्रार्थनास्थळी फुला-फळांची उधळण, तेही मोफत
छत्रपती संभाजीनगर : प्रार्थनास्थळांमध्ये जाऊन प्रार्थना करणाऱ्या भाविकांना आता त्या प्रार्थनास्थळीच, प्रार्थनास्थळांच्या ट्रस्टी, विश्वस्तांद्वारे फुलं, पानं, फळं मिळाली तर किती सोयीचे होईल ना? आणि ही सोयदेखील मोफत मिळाली तर कोणाला नकोय? नक्कीच हवीय. ही अफलातून कल्पना प्रत्यक्षात उतरवणार आहे सामाजिक वनीकरण विभाग. यंदा १ लाख ३५ हजार वेगवेगळी फुलझाडं, फळझाडं आणि भारतीय वंशाची विविध झाडं सामाजिक वनीकरण विभागाद्वारे तालुक्यातील प्रार्थनास्थळांना दिली जाणार आहेत.
या अनोख्या उपक्रमातून औरंगाबाद शहर व तालुक्यातील सर्वच प्रार्थनास्थळी १ लाख ३५ हजार झाडं लावली जाणार आहेत. या सर्व झाडांचे संगोपन त्या त्या प्रार्थनास्थळांच्या ट्रस्टींना (विश्वस्तांना), भाविकांना, सामाजिक संस्थांना करण्यास सांगितले जाणार आहे. यासाठी तसे आवाहन करून तसे आश्रयदाते स्वीकारले जाणार आहेत.
कोणती झाडे असणार
तुळस, कवठं, बेल, आंबा, पिंपळ, वड, निंब, लिंबू आदी मोठी भारतीय वंशाची झाडं तसेच गुलाब, मोगरा, स्वस्तिक, जाई, जुई, यासारखी काही फुलझाडे दिली जाणार आहेत. यासाठी बेलवन आणि पंचायत वन अशी नावेदेखील सामाजिक वनीकरण विभागाने दिली आहेत. रोपवाटिकांत या वरील उल्लेखलेल्या रोपांव्यतिरिक्त इतरही भारतीय वंशांची झाडे असतील. ही झाडं जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बजेट मंजुरीतून उभारण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
कुठे होणार निर्मिती
यंदा पावसाळा अतिउशिरा सुरू झाला असला तरी औरंगाबाद तालुक्यातील छत्रपती संभाजीनगर शहर, तिसगावजवळ सोलापूर हायवेच्या जागेसह साजापूर, कन्नड, सिल्लोड, खुलताबाद, वैजापूर पानगाव, सोयगाव बनोटी आदी ठिकाणी मंदिर तसेच गायरान जागेवर या वनाची निर्मिती केली जाणार आहे. प्रत्यक्षात एक एकरवरील जागेत हे बेलवन व पंचायत वनची निर्मिती केली जाणार आहे. १०० झाडं एका प्रार्थनास्थळाला १०० झाडांची एका प्रार्थनास्थळाच्या बेलवनात आणि पंचायत वनात लागवड केली जाणार आहे. याची जबाबदारी देण्याचेही नियोजन ठरविण्यात येणार आहे. लागवडीपासून ते त्याच्या देखरेख व संगोपनावर लक्ष ठेवण्यात येणार आहे.
शहर व तालुक्यातील प्रार्थनास्थळांना आवाहन
या मोहिमेसाठी शहर व तालुक्यातील सर्वच प्रार्थनास्थळांना ही रोपवन संकल्पना राबविता येणार आहे. त्यांना या निमित्ताने सामाजिक वनीकरण विभागाशी संपर्क साधून झाडं मिळवावी लागणार आहेत. बेलवन व पंचायत वन अशा दोन संकल्पना राबविण्यासाठी सामाजिक वनीकरण विभाग जनजागृती करत आहे. परंतु, सामाजिक सेवाभावी संस्थांनी स्वत:हून या उपक्रमात सहभागी होऊन हा उपक्रम यशस्वी कसा करता येईल, यासाठी विभागातर्फे प्रयत्न करण्यात येत आहे.
- कीर्ती जमधडे, विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण