आता खते, बियाणांचा दुष्काळ
By Admin | Updated: April 28, 2016 23:51 IST2016-04-28T23:34:19+5:302016-04-28T23:51:24+5:30
सुनील कच्छवे, औरंगाबाद दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना यंदाच्या खरिपात खते आणि बियाणांच्या टंचाईलाही सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

आता खते, बियाणांचा दुष्काळ
सुनील कच्छवे, औरंगाबाद
दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना यंदाच्या खरिपात खते आणि बियाणांच्या टंचाईलाही सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. विभागात शासनाने खताचा मागणीपेक्षा ४ लाख मेट्रिक टनांनी कमी साठा मंजूर केला आहे. त्याशिवाय सोयाबीनच्या बियाणाचाही तब्बल सव्वालाख क्विंटलचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात चार वर्षांपासून सातत्याने दुष्काळ पडत आहे. यंदाही कमी पावसामुळे खरिपाची बहुतांशी पिके हातची गेली. अनेक भागात रबीचा पेराही झाला नाही. त्यामुळे विभागातील शेतकरी पूर्णपणे नागवला गेला. या परिस्थितीत आता शेतकऱ्याला यंदाच्या खरिपात बियाणे आणि खतांच्या टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. शासनाने विभागासाठी खतांचा कमी साठा मंजूर केला आहे. कृषी विभागाने मराठवाड्यासाठी एकूण १४ लाख ७४ हजार मेट्रिक टन खतांची मागणी नोंदविली होती. प्रत्यक्षात १० लाख २९ हजार मेट्रिक टन खताचा साठा मंजूर झाला आहे. त्यापैकी आतापर्यंत ६५ हजार मेट्रिक टन खतांचा साठा दाखल झाला आहे.
मराठवाड्यात सरासरी ५४ लाख हेक्टर पेरणी क्षेत्र आहे. त्यापैकी सुमारे १६ लाख हेक्टरवर कपाशीची लागवड होणे अपेक्षित आहे. तर सोयाबीनचे क्षेत्र १० लाख २९ हजार हेक्टरपर्यंत राहण्याची शक्यता आहे. दोन्ही पिकांचे क्षेत्र दरवर्षी वाढत आहे. त्यामुळे खतांची मागणीही वाढते आहे. त्यादृष्टीने कृषी विभागाने १४ लाख ७४ हजार मेट्रिक टन खतांची मागणी नोंदविली आहे. मात्र, शासनाने १० लाख २९ हजार मेट्रिक टन इतका साठा मंजूर केला आहे. परिणामी विभागात खतांचा विशेषत: युरिया आणि संयुक्त खतांचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. खतांप्रमाणेच सोयाबीनच्या बियाणांचीही उपलब्धता गरजेपेक्षा कमी असणार आहे.
कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार मराठवाड्यात सोयाबीनच्या पेरणीसाठी एकूण ६ लाख १७ हजार क्विंटल एवढ्या बियाणांची गरज आहे. शेतकरी, खाजगी कंपन्या, महाबीज कंपनी आदींकडील बियाणांची उपलब्धता केवळ ४ लाख ९७ हजार क्विंटल एवढी आहे. त्यामुळे विभागात १ लाख २० क्विंटल बियाणांचा तुटवडा भासू शकतो.
मराठवाड्यात गेल्या वर्षी खताला कमी उठाव होता. त्यामुळे काही ठिकाणी खत शिल्लक आहे. सोयाबीनचा फारसा तुटवडा भासेल असे दिसत नाही. तरीही कृषी विभाग सर्वतोपरी काळजी घेत आहे. शेतकऱ्यांना खते-बियाणे वेळेत मिळतील यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
- पंडित लोणारे, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी