बीड : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात सहभागी होण्यासाठी ग्रामपंचायतींना आता पाणंदमुक्तीची अट घालण्यात आली आहे. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने यासंदर्भात नुकत्याच सुधारित मार्गदर्शन सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांप्रमाणे योजना राबवली जाईल, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वासनिक यांनी सांगितले.गतवर्षी ग्रामस्वच्छता अभियानाला शासनस्तरावरुन अचानक स्थगिती आली होती. त्यामुळे योजनेला खिळ बसली आहे. दरम्यान, सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार आता २ आॅक्टोबर पासून अभियानाची सुरुवात होणार आहे. विभागीय व राज्य स्तरावर केआरसी (मुख्य संसाधन केंद्र) यांच्यामार्फत मूल्यांकन होणार आहे. तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या ग्रा.पं. ना पूर्वी २५ हजार, द्वितीय १५ हजार, तृतीय १० हजार रुपये एवढी बक्षीस रक्कम दिली जात होती, आता त्यात घसघशीत वाढ केली आहे. प्रथम एक लाख, द्वितीय ५० हजार, तृतीय २५ हजार अशी तरतूद आहे. (प्रतिनिधी)
ग्रामस्वच्छता अभियानासाठी आता पाणंदमुक्तीची अट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2016 00:48 IST