सगळाच हापूस कोकणातील नसतो; देवगडच्या नावाखाली परराज्यातील आंबा ग्राहकांच्या माथी
By प्रशांत तेलवाडकर | Updated: April 15, 2023 13:58 IST2023-04-15T13:57:03+5:302023-04-15T13:58:11+5:30
नाव कोकणातील देवगडचं अन् कर्नाटकचा हापूस आंबा ग्राहकांच्या माथी

सगळाच हापूस कोकणातील नसतो; देवगडच्या नावाखाली परराज्यातील आंबा ग्राहकांच्या माथी
छत्रपती संभाजीनगर : ‘आमच्याकडे कोकणातील अस्सल देवगडचा हापूस मिळतो’ असे बॅनर आपण रस्त्यां-रस्त्यांवर वाचत असाल. दुकानात ठेवलेले सर्वच आंबे जसे हापूस नसतात, तसेच सर्वच हापूस आंबा हा देवगडचा नसतो. अहो, अनेकदा ग्राहकांच्या अज्ञानाचा फायदा घेत विक्रेत्यांकडून कोकणातील हापूसऐवजी कर्नाटकचा हापूस ग्राहकांच्या माथी मारला जातो. ही ग्राहकांची फसवणूक आहे, जागो ग्राहक जागो...
शहरात कुठून येतो हापूस
शहरात हापूस आंबा कोकणातून म्हणजे रत्नागिरी, देवगड येथून आणला जातो. याशिवाय कर्नाटक, केरळ, तामिळनाडू या राज्यांतून हापूस आंबा मोठ्या प्रमाणात शहरात विक्रीसाठी येतो. मात्र, या परराज्यातील हापूसला कोकणातील हापूसची चव येत नाही.
देवगड व परराज्यातील हापूसमधील फरक
जे नेहमी देवगडचा हापूस आंबा खातात, त्या खवय्यांनाच तो आंबा चवीने ओळखता येतो. हापूस आंबा ओळखण्यात अनेकदा व्यापारीही फसतात. मात्र, देवगड व कर्नाटक हापूसमधील फरक पुढीलप्रमाणे
देवगड हापूस- कर्नाटकातील हापूस
१) हापूस आंब्याची साल पातळ असते. १) हापूस आंब्याची साल जाड असते.
२) हा हापूस गोलाकार असतो. २) हापूस थोडासा उभट, लांब असतो.
३) तोंडाशी केशरी किंवा लालसर व खालच्या बाजूला पिवळसर असतो. ३) तोंडाशी पिवळसर आणि खालच्या बाजूला हिरवट असतो.
४) हापूसच्या सुगंधाचा दरवळ पसरतो. ४) या हापूसला सुगंध नसतो.
५) ४ ते ५ दिवस टिकतो. ५) दोन दिवसांत खराब होतो.
६) खराब होत नाही, सुकून जातो. ६) काळा डाग पडतो.
आपल्याकडे नंबर एक हापूस शक्यतो येत नाही
आपल्या शहरात शक्यतो नंबर एक हापूस विक्रीसाठी येत नाही. काहीजण आणतात, पण तो सर्वसामान्यांच्या खिशाला परवडत नाही. आपल्या येथे क्वालिटीनुसार दोन, तीन, चार नंबरचे आंबे येतात.
हापूसच्या किमतीतील फरक
देवगड हापूस (डझन) परराज्यातील हापूस
८०० ते १२०० रुपये --- ५०० ते ७०० रुपये