"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
By संतोष हिरेमठ | Updated: July 12, 2025 13:52 IST2025-07-12T13:49:30+5:302025-07-12T13:52:30+5:30
संजय शिरसाट यांचा पैशांच्या बॅगचा असलेला एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यावरून राज्यभरात एकच चर्चा सुरू आहे.

"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
छत्रपती संभाजीनगर : पैशांसाठी काही अडले असे समजण्याचे काहीच कारण नाही. पैसे देणारे आम्हीच आहोत. 'आजकल हमारा नाम बहुत चल रहा है'. त्यामुळे पैशांची चिंता नाही. एखादी बॅग तुमच्याकडे (अधिष्ठाता )पाठवून देऊ, अशी मिश्कील टिप्पणी पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केली.
शासकीय कर्करोग रुग्णालयात आयोजित मेमोग्राफी यंत्राच्या उद्घाटन समारंभप्रसंगी संजय शिरसाट बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी घाटी रुग्णालयातील लहान बांधकामांसाठी निधीची मागणी केली होती. संजय शिरसाट यांचा पैशांच्या बॅगचा असलेला एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यावरून राज्यभरात एकच चर्चा सुरू आहे. कार्यक्रमात मार्गदर्शन करताना शिरसाट यांनी बॅगचा उल्लेख करत घाटी रुग्णालयाला निधी दिला, असे सांगितले. कार्यक्रमाप्रसंगी मंत्री अतुल सावे शासकीय कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड आदींची उपस्थिती होती.
ठाकरे सेनेचा शिरसाट यांच्यावर हल्ला
उद्धवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचा एक व्हिडीओ 'एक्स'वर पोस्ट केला आहे. शिरसाट बेडवर बसून मोबाईलवर बोलत असून बेडच्या शेजारी नोटांची बॅग असल्याचा दावा राऊत यांनी केला. आयटी नोटिशीनंतर शिरसाटांचा हा व्हिडीओ माझ्याकडे आला आहे, असेही राऊत यांनी म्हटले आहे. तर आयटीची नोटीस आली तरी शिरसाट ऐटीत फिरत आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी उद्धवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केली.
टार्गेट करण्याचा प्रयत्न
यावर विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलताना मंत्री शिरसाट म्हणाले की, व्हिडिओत तुम्ही पाहताय ते बेडरूममध्ये मी बसलेलो आहे. बाजूला माझा सर्वात लाडका कुत्रा आहे. व्हिडीओबद्दल मला आश्चर्य नाही, यात काही गैर नाही, टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. एक बॅग ठेवलेली आहे. एवढी मोठी पैशांची बॅग ठेवायची असती तर अलमाऱ्या काय मेल्यात का? या बॅगमध्ये पैसे नाहीत तर कपडे आहेत, असा दावाही शिरसाट यांनी केला.