जलवाहिनीची हायड्रोलिक चाचणी नाही; गुणवत्ता तपासणीलाही मजीप्राकडून बगल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 20:21 IST2025-02-10T20:20:24+5:302025-02-10T20:21:17+5:30

जलवाहिनी टाकण्यापूर्वी पाइपची गुणवत्ता तपासण्यात आली होती का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

No hydraulic test of water pipeline; Maharashtra Jeewan Pradhikaran also ignores quality inspection | जलवाहिनीची हायड्रोलिक चाचणी नाही; गुणवत्ता तपासणीलाही मजीप्राकडून बगल

जलवाहिनीची हायड्रोलिक चाचणी नाही; गुणवत्ता तपासणीलाही मजीप्राकडून बगल

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने मागील वर्षी अत्यंत घाईघाईत ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकली. नागरिकांना पाणी देणे गरजेचे आहे, हे कारण दाखवत जलवाहिनी सुरू केली. अवघ्या सहा महिन्यांतच चार वेळेस जलवाहिनीचे पाइप किती निकृष्ट दर्जाचे आहेत, हे उघडकीस येत आहे. मजीप्रा अधिकारी, कंत्राटदारांनी जलवाहिनीची हायड्रोलिक चाचणी घेतली असती तर जलवाहिनी पाण्याचा दाब किती सहन करू शकते, हे उघड झाले असते.

शहराला सध्या दोन जलवाहिन्यांद्वारे पाणीपुरवठा होतोय. १९७३-७४ मध्ये ७०० मिमी व्यासाची जलवाहिनी जायकवाडी ते फारोळ्यापर्यंत टाकण्यात आली. दुसरी १२०० मिमी व्यासाची जलवाहिनी १९८२-८३ मध्ये टाकली. या दोन्ही जलवाहिन्यांचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने केले. त्यांचा दांडगा अनुभव लक्षात घेऊन तत्कालीन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी २०० कोटी रुपये खर्च करून तातडीने ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकायला लावली. यातून ७५ एमएलडी पाणी अपेक्षित आहे. सध्या जलवाहिनीतून जेमतेम १० ते १२ एमएलडी पाणी येत आहे. रविवारी या जलवाहिनीला धनगाव येथे चक्क भगदाड पडले.

क्रॉस कनेक्शनचा प्रयोग
१) मागील वर्षी जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाल्यावर शहराला पाणी देण्यासाठी मजीप्राने ९०० आणि १२०० मिमी जलवाहिनीला क्रॉस कनेक्शन दिले.
२) १२०० मिमीची जुनी जलवाहिनी प्रेशर सहन करू शकली नाही. अनेक ठिकाणी ती फुटली. हा प्रयोग अयशस्वी झाला.
३) बिंग फुटू नये म्हणून हायड्रोलिक चाचणीला बगल देत एका पंपावर जलवाहिनी सुरू केली. शेवटी ती फुटलीच.

गुणवत्तेची तपासणी नाही
जलवाहिनी टाकण्यापूर्वी पाइपची गुणवत्ता तपासण्यात आली होती का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. गुणवत्ता तपासली असती तर सहा महिन्यांत जलवाहिनीला भगदाड पडलेच नसते. या प्रकरणात मजीप्रा अधिकाऱ्यांची अक्षम्य चूक असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.

...म्हणे सर्ज टँक नाही
जलवाहिनीवरील पंप बंद पडल्यावर रिव्हर्स येणाऱ्या पाण्याच्या प्रेशरने ती फुटल्याचे मजीप्रा अधिकारी मनपाला सांगत आहेत. सर्ज टँक असते तर असे झाले नसते, असेही त्यांचे म्हणणे आहे. मग मजीप्रानेच टाकलेल्या ७०० आणि १२०० मिमीच्या जलवाहिनीवर सर्ज टँक का नाहीत. ४५ वर्षांपासून या जलवाहिन्या सर्ज टँकविना सुरू आहेत.

Web Title: No hydraulic test of water pipeline; Maharashtra Jeewan Pradhikaran also ignores quality inspection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.