फुकट कचोरी दिली नाही, गुन्हेगारांचा नारळीबागेत राडा; व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 20:04 IST2025-10-13T20:04:04+5:302025-10-13T20:04:45+5:30
पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर पुन्हा गुंडांना नेत भावावरही केला हल्ला, एकाला अटक, तिघे पसार

फुकट कचोरी दिली नाही, गुन्हेगारांचा नारळीबागेत राडा; व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला
छत्रपती संभाजीनगर : स्वत:ला परिसराचा दादा म्हणत, खाल्लेल्या कचोरीचे शंभर रुपये न देता, व्यावसायिकावर दोन गुंडांनी प्राणघातक हल्ला केला. या प्रकरणी व्यावसायिक पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जाताच, पुन्हा याच टोळीने त्यांच्या भावावर हल्ला चढवत जीवे मारण्याची धमकी देत, राडा केला. नारळीबाग परिसरातील शेगाव कचोरी सेंटरवर १० ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता ही घटना घडली.
आकाश हाडुळे, संताेष भिसे आणि प्रथमेश भल्हाळ (सर्व रा.नारळीबाग) अशी गुंडांची नावे असून, त्यांच्यावर सिटीचौक पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले. नामदेव कराडे (२५, रा.पडेगाव) यांची नारळीबागेत शेगाव कचोरी सेंटर आहे. १० ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता ते हॉटेलमध्ये असताना आराेपी आकाश मित्रासह तेथे गेला. शंभर रुपयांच्या कचोरी खाऊन पैसे न देताच निघाला. कराडेने त्याला बिलाचे पैसे मागितले. मात्र, आकाश हाडुळेने ‘तू मला पैसे कसे मागतो, मी इथला दादा आहे,’ असे म्हणत शिवीगाळ केली. कराडेने त्याकडे दुर्लक्ष करत निघून जाण्यास सांगितले. मात्र, तरीही त्याने त्यांच्या दुकानातील झाऱ्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. लाकडी दांडा आणत त्यांच्यासह त्यांच्या भावाला गंभीर मारहाण केली, शिवाय तू इथे धंदा कसा करतो, हेच पाहतो, अशीही धमकी दिली.
यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल, अटकही
कराडे हे रुग्णालयात उपचार घेऊन सिटीचौक पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले. या दरम्यान, कराडेंचा भाऊ संतोष दुकान बंद करण्यासाठी परत गेला, तर आकाश, संतोष भिसे, प्रथमेश भल्हाळने तेथे जाऊन पुन्हा हल्ला चढवला. पोलिसांकडे तक्रार का केली, असे म्हणत डोक्यात दांड्याने वार करत जीवे मारण्याची धमकी देत, भर रस्त्यावर धिंगाणा घातला. सिटीचौक पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी आरोपींवर दोन गुन्हे दाखल केले. त्यानंतर, उपनिरीक्षक संजय राठोड यांनी आकाशला तत्काळ अटक केली. त्याला अटक होताच, अन्य गुंड पळून गेले. आकाशवर यापूर्वी गंभीर गुन्हे असून, गंभीर कारवाई केली जाणार असल्याचे उपनिरीक्षक राठोड यांनी सांगितले.