पोलिसांचा ना धाक, ना रात्री गस्त; छत्रपती संभाजीनगरात ९ दिवसांत चोरी, लूटमारीच्या ३४ घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 18:28 IST2025-06-11T18:26:58+5:302025-06-11T18:28:42+5:30

सततच्या लूटमारीच्या घटनांमुळे पोलिसांचा ना दिवसा धाक उरला, ना रात्री गस्त आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया सामान्यांमधून उमटत आहे.

No fear of police, no night patrols; 34 incidents of theft, loot in 9 days in Chhatrapati Sambhajinagar | पोलिसांचा ना धाक, ना रात्री गस्त; छत्रपती संभाजीनगरात ९ दिवसांत चोरी, लूटमारीच्या ३४ घटना

पोलिसांचा ना धाक, ना रात्री गस्त; छत्रपती संभाजीनगरात ९ दिवसांत चोरी, लूटमारीच्या ३४ घटना

छत्रपती संभाजीनगर : पोलिसांचा धाक न उरलेल्या लुटारूंनी जून महिन्याच्या नऊ दिवसांत तब्बल ३४ घटनांत लूटमार, चोऱ्या करत पोलिसांना आव्हान दिले. विशेष म्हणजे, मध्यवर्ती बसस्थानकातील मोबाइल चोरीच्या तक्रारीत क्रांती चौक पोलिसांनी गहाळ झाल्याची नोंद करून तक्रारदाराला ठाण्यातून पाठवून दिले. सततच्या लूटमारीच्या घटनांमुळे पोलिसांचा ना दिवसा धाक उरला, ना रात्री गस्त आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया सामान्यांमधून उमटत आहे.

शहरात ठिकठिकाणी महिला, ज्येष्ठ नागरिकांच्या गळ्यातील सोनसाखळी, मोबाइल हिसकावले जात आहेत. विशेष म्हणजे, अंतर्गत रस्त्यांऐवजी मुख्य रस्त्यांवर, दिवसाढवळ्या या घटना घडत असताना पोलिसांना चोरांचा माग काढता आलेला नाही. जळगाव जिल्ह्यातील कल्पेश पाटील यांनी नुकताच नवा मोबाइल खरेदी केला होता. ७ जून रोजी ते कामानिमित्त शहरात आले होते. सकाळी मध्यवर्ती बसस्थानकात उतरताच त्यांचा मोबाइल चोरांनी लंपास केला. क्रांती चौक पोलिसांनी त्यांच्या तक्रारीची केवळ गहाळ म्हणून नोंद करत त्यांना ठाण्यातून अक्षरशः हाकलले.

घटना १ - वटसावित्री पौर्णिमेनिमित्त पूजेला पायी निघालेल्या शोभा गोविंद होट्टे यांच्या गळ्यातील ३.५ ताेळ्यांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरांनी हिसकावले. शिवाजीनगर रोडवरील लक्ष्मीनगरच्या जानकी हॉटेलमागील परिसरात स्पोर्ट्स बाइकवरून आलेल्या व काळ्या टी-शर्टमधील दोघा लुटारूंनी तोंडाला रुमाल बांधला होता.

घटना २- सिटी बसमधून प्रवास करताना उषा संजय बोर्डे यांच्या पर्समधून चोरांनी २ तोळ्याचे दागिने लंपास केले. ९ जून रोजी उषा दुपारी ४ वाजता बाबा पंप ते चिकलठाणा या सिटी बसमध्ये होत्या. क्रांती चौकापर्यंत जाईपर्यंत त्यांच्या पर्समधील छोटी पर्स चोराने लंपास केली.

घटना ३- रस्त्यावर महिलेला शिवीगाळ करणाऱ्याला दूर जाण्यास सांगण्यासाठी गेलेल्या पूनमसिंग सुंदरडे (रा. गारखेडा) यांच्या पोटात एकजण चाकू खुपसून खिशातील दोन मोबाइल घेऊन पसार झाला. रविवारी रात्री ११.३० वाजता गारखेड्यातील गणेशनगरमध्ये ही घटना घडली.

घटना ४- सिडको चौकात ट्रॅव्हल्स बसची वाट पाहणाऱ्या ज्ञानेश्वर मापारी यांना ट्रिपलसीट दुचाकीस्वारांनी (एमएच २० ईएच ०८७२) गुंडगिरी करत मोबाइल, खिशातील साडेसात हजार रुपये लुटले. १ जून रोजीच्या घटनेप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिसांनी ८ दिवसांनी गुन्हा दाखल केला.

नऊ दिवसांत लूटमार, चोरीचे ३४ गुन्हे
१६ (वाहन चोरी), ११ (घरफोड्या, अन्य चाेऱ्या), ७ (लूटमार) = ३४ गुन्हे

दबा धरण्याचा मुख्य हेतू हल्ला, घरफोड्या
रात्रपाळीबाबत पोलिस गंभीर नसल्याची कबुलीच काही पोलिस अधिकाऱ्यांनीही दिली. गस्तीसाठीचे पथक एकाच ठिकाणी वाहन उभे करून वेळकाढूपणा करतात. अशा स्थितीत गुन्हेगार सर्रास लूटमार करतात.

Web Title: No fear of police, no night patrols; 34 incidents of theft, loot in 9 days in Chhatrapati Sambhajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.