वीजही नाही, पाणीही नाही, नागरिक घामाघूम, ४० हजार वीज ग्राहकांना ‘शाॅक’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 19:23 IST2025-05-02T19:23:46+5:302025-05-02T19:23:53+5:30

झाड कोसळले व केबलच्या नादुरुस्तीने विविध भागांचा वीजपुरवठा खंडित

No electricity, no water, citizens are sweating, 40 thousand electricity consumers are in shock | वीजही नाही, पाणीही नाही, नागरिक घामाघूम, ४० हजार वीज ग्राहकांना ‘शाॅक’

वीजही नाही, पाणीही नाही, नागरिक घामाघूम, ४० हजार वीज ग्राहकांना ‘शाॅक’

छत्रपती संभाजीनगर : ग्रामीण पोलिस कॉलनीजवळ वीजवाहिन्यांवर झाड कोसळून, तर सिडको बस स्थानक परिसरात भूमिगत केबल नादुरुस्त झाल्याने शहरातील विविध भागांचा वीजपुरवठा बुधवारी खंडित झाला. याचा तब्बल ४० हजार वीजग्राहकांना फटका बसला. विजेअभावी घामाघूम होण्याची वेळ त्यांच्यावर ओढावली. ऐन पाणी येण्याच्या वेळेत वीज ‘गुल’ झाल्याने काही भागांत नागरिकांना पाणी भरताना मोठी कसरतही करावी लागली.

सिडको बस स्थानक परिसरात ३३ केव्ही वाहिनीच्या भूमिगत केबलमध्ये बिघाड झाला. सकाळी ९ वाजता महावितरणचे अभियंते-कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन पर्यायी केबलचे काम सुरू केले. त्यासाठी एन-४ व म्हाडा या ३३ केव्ही वाहिन्यांचा वीजपुरवठा खबरदारीचा उपाय म्हणून सकाळी १० ते दुपारी १२:३० वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आला. यामुळे एन-४ व म्हाडा उपकेद्रांवरील सुमारे ३५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बंद होता. पर्यायी केबलचे काम करून १२.३० वाजता वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. अधीक्षक अभियंता मनीष ठाकरे, कार्यकारी अभियंता महेश पाटील, अतिरिक्त कार्यकारी अभियंता दिनेश चावडा, प्रशांत नाखले, सहायक अभियंता विजय काथार, जितेंद्र पन्नाभट्टी, प्रदीप निकम, अक्षय अबदलवार यांनी वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी परिश्रम घेतले.

कटकट गेट, एसटी कॉलनीतील ५ हजारांवर ग्राहक अंधारात
सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास पोलिस कॉलनी, एन-१० येथे सुराणानगर व कटकट गेट फिडरवरील कट पाॅइंट पोलवर झाड पडल्याने दोन्ही पोल पूर्णपणे वाकून तारा तुटल्या. यामुळे कटकटगेट, एसटी कॉलनी, सुराणानगर, बायजीपुरा परिसरातील ५ हजार ५०० ग्राहकांचा विद्युतपुरवठा खंडित झाला.

झाड कापण्याचे यंत्र पडले बंद
पडलेले झाड बाजूला करण्यासाठी अग्निशमन दलास निरोप देण्यात आला. परंतु, त्यांचे झाड कापण्याचे यंत्र बंद पडल्याने त्यांना झाड तोडता आले नाही. त्यानंतर खासगी व्यक्ती बोलावून झाड तोडण्यात आले. यामध्ये ३ तास गेले. झाडात अडकलेल्या तारा काढून एक खांब उभा करून तारा जोडण्यात आल्या. सायंकाळी ५:३० वाजता वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजीव कोंडगुळी, सहायक अभियंता अभय अरणकल्ले यांच्यासह कर्मचारी व ठेकेदारांनी कटकटगेट, एसटी कॉलनी, सुराणानगर आदी भागांतील वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी परिश्रम घेतले.

Web Title: No electricity, no water, citizens are sweating, 40 thousand electricity consumers are in shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.