छत्रपती संभाजीनगरात रात्रीतून रिक्षाचालकांची तपासणी; १६ मद्यधुंद, १४६ जणांना १.८० लाखांचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 20:05 IST2025-06-13T20:04:46+5:302025-06-13T20:05:17+5:30
लोकमत पाठपुरावा : तपासणीचा सुगावा लागताच रिक्षा सोडून काही चालक पसार

छत्रपती संभाजीनगरात रात्रीतून रिक्षाचालकांची तपासणी; १६ मद्यधुंद, १४६ जणांना १.८० लाखांचा दंड
छत्रपती संभाजीनगर : रिक्षाचालकांमध्ये वाढत्या गुन्हेगारी व बेशिस्तीच्या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक पोलिसांनी बुधवारी रात्री ‘सरप्राइज चेकिंग’ मोहीम राबवली. यात १६ रिक्षाचालक नशेत बेधुंद असल्याचे आढळून आले. त्यांच्या १६ रिक्षांसह सर्वाधिक दंड प्रलंबित असलेल्या १२ रिक्षा पोलिसांनी जप्त केल्या. १४६ चालकांना १ लाख ८० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
गेल्या काही वर्षांत या व्यवसायात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या चालकांची संख्या वाढली आहे. प्रवाशांशी असभ्य वर्तन, लूटमार, महिलांशी गैरवर्तन यासोबतच किरकोळ कारणांवरून चालकांकडून प्रवाशांवरच हल्ले झाल्याच्या घटना सातत्याने घडल्या आहेत. ३ जून रोजी श्रीरामपूरच्या जयराम पिंपळे यांची नशेखोर रिक्षाचालकाने पैशांच्या वादातून हत्या केल्याने प्रवाशांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. ‘लोकमत’ने सलग ३ दिवस यासंदर्भात वृत्तमालिका प्रकाशित केल्यानंतर शहर पोलिस रिक्षाचालकांवर कारवाईसाठी रस्त्यावर उतरले.
उपायुक्त शिलवंत नांदेडकर, सहायक आयुक्त धनंजय पाटील यांच्या आदेशावरून बुधवारी रात्री ११:०० वाजता रेल्वेस्थानक, मध्यवर्ती बसस्थानकासह विविध चौकांत एकाचवेळी तपासणी मोहीम राबवण्यात आली. एकूण ४०२ चालकांची ब्रेथ ॲनालायझर यंत्राद्वारे तपासणी करण्यात आली. यामध्ये १६ चालक नशेत बेधुंद आढळले. १ लाख ८० हजार रुपयांच्या दंडापैकी ३७ हजार ६५० रुपयांचा दंड जागेवर वसूल करण्यात आला.
चूक नाही तर पळाले का?
पोलिसांनी अचानक तपासणी सुरू केल्याने अनेक रिक्षाचालकांनी रेल्वेस्थानक, बसस्थानकावर प्रवासी भरणे टाळून तशीच रिक्षा सोडून पळ काढला. त्या रिक्षाचालकांबद्दल दाट संशय निर्माण झाला आहे. अशा व्यक्तींचे स्थानिक पोलिस ठाण्यांकडून सातत्याने गुन्हेगारी रेकॉर्ड तपासणे गरजेचे असल्याचे मत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.