'तोरण' बांधण्यास येणाऱ्या मुलाची आली मरणाची बातमी; दुचाकींच्या समोरासमोर धडकेत दोन तरुण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 18:05 IST2021-09-10T18:05:35+5:302021-09-10T18:05:56+5:30
सोलापुर-धुळे महामार्गावर अंधानेर बायपासजवळ हा अपघात झाला.

'तोरण' बांधण्यास येणाऱ्या मुलाची आली मरणाची बातमी; दुचाकींच्या समोरासमोर धडकेत दोन तरुण ठार
कन्नड : दुचाकीच्या समोरासमोर धडक झालेल्या अपघातात दोन तरुण जागीच ठार झाले. सोलापुर-धुळे महामार्गावर अंधानेर बायपासजवळ हा अपघात शुक्रवारी दुपारी १२ वाजेदरम्यान घडला. संजय सखाराम माळवे (२५ रा.सातकुंड ) व सागर पांडूरंग काळे ( ३०,रा. औरंगाबाद ) अशी मृतांची नावे आहेत.
खाजगी बांधकाम कंपनीत अभियंता असलेला सागर काळे मोटारसायकलने ( एमएच २० एफडी ७५७७) चाळीसगावकडून औरंगाबादकडे जात होता. तर दुसरा दुचाकीस्वार संजय माळवे हा सुद्धा मोटारसायकलने ( एमएच १९ एजी ००२६) औरंगाबादकडून सातकुंड येथे चालला होता. अंधानेर बायपासवर सध्या एकाच बाजूने वाहनांची ये-जा सुरु आहे. यामुळे या दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली. अपघातात दोघेही मोटारसायकलस्वार जागीच ठार झाले.अपघाताची माहिती मिळताच पोनि राजीव तळेकर, सपोनि डी.बी.वाघमोडे, सपोनि सचिन खटके, पोना रामचंद्र बोंदरे, पोकॉ एस.जी.आंधळे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
हेही वाचा - पीक विमा कंपनीला मोठा नफा, शेतकऱ्यांना मिळू शकतात हेक्टरी १० हजार ?
तोरण बांधायला जात होता सागर
गणेश चतुर्थी असल्याने श्रीगणेश मुर्तीची स्थापना करण्यासाठी सागर आपल्या घरी जात होता. घराला बांधण्यासाठी मांगल्याचे प्रतिक समजले जाणारे आंब्याच्या पानाचे तोरण बांधण्यासाठी आंब्याच्या पानांची पिशवी घेऊन चालला होता मात्र त्याला हे ठाऊक नव्हते की त्याच्या नशिबात तोरण नव्हे तर मरण होते.