नवविवाहितेला मोबाईलचा अतिरेक नडला; मोबाईलवर बोलतांना जिन्यावरून पडल्याने झाला मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 18:29 IST2019-06-12T18:28:53+5:302019-06-12T18:29:41+5:30
जिना उतरत असताना पाय निसटल्याने ती जिन्यावरून खाली कोसळली.

नवविवाहितेला मोबाईलचा अतिरेक नडला; मोबाईलवर बोलतांना जिन्यावरून पडल्याने झाला मृत्यू
औरंगाबाद: मोबाईल वापराचा अतिरेक दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. मोबाईलवर बोलत जिना उतरतांना तोल जाऊन पडल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या नवविवाहितेचा उपचारादरम्यान ११ जून रोजी रात्री अडिच वाजेच्या सुमारास घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना गंगापूर जहाँगिर येथे घडली.
मुस्कान रामअवतार कुर्मी (वय २५, ह.मु. अष्टविनायक कॉलनी,गंगापूर जहाँगिर, मूळ रा. केवारना, मध्यप्रदेश) असे मृत विवाहितेचे नाव आहे. मध्यप्रदेशातील मुस्कान आणि रामअवतार कुर्मी यांनी तीन महिन्यापूर्वी प्रेमविवाह केला. यानंतर दोघेही कामधंद्याच्या शोधात औरंगाबादेतील शेंद्रा एमआयडीसीमध्ये आले. गंगापूर जहाँगिर येथे हे नवविवाहित दाम्पत्य खोली भाड्याने घेऊन राहू लागले. रामअवतार हे एका खाजगी कंपनीत नोकरी करीत होते. ५जून रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घरातून मुस्कान ही नातेवाईकांसोबत मोबाईलवर बोलत होती. जिना उतरत असताना तिचा पाय निसटला आणि मुस्कान जिन्यावरून खाली कोसळली.
या घटनेत मुस्कानच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेनंतर मुस्कानला धूत हॉस्टिलमध्ये दाखल करण्यात आले होते. अधिक उपचारासाठी घाटी रुग्णालयात हलविण्यात आले होते. उपचारादरम्यान ११ जून रोजी मध्यरात्री मुस्कानचा मृत्यू झाला. माहिती मिळताच चिकलठाणा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. याविषयी अकस्मात मृत्यूची नोंद केल्याची माहिती चिकलठाणा ठाण्याचे सहायक निरीक्षक महेश आंधळे यांनी दिली.